मुंबई : दिवंगत पंडित जसराज यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज (८६ वर्षे) यांचे बुधवार २५ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मधुरा यांनी त्यांचे पती पंडित जसराज यांच्यासोबत अनेक माहितीपट आणि नाटकांचं दिग्दर्शन केले आहे. सोबतच त्यांनी पंडित जसराज यांचे चरित्रही लिहिले आहे. त्यांच्या पश्चात दुर्गा जसराज आणि श्रीरंग देव पंडित ही दोन मुले आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुरा यांनी 'मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमा' आणि 'शांताराम यांचे ५५० पानांचे मराठी चरित्र' यांसारखी काही पुस्तके लिहिली आहेत. २०१० मध्ये त्यांनी 'आई तुझा आशीर्वाद' हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. वयाच्या ७३ व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे त्यांची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात वयस्कर आणि नवोदित दिग्दर्शक नोंद झाली.