मराठा आरक्षण देणं आणि कोर्टात टिकवणं आमची कमिटमेंट : देवेंद्र फडणवीस

    25-Sep-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नवी मुंबई : मराठा आरक्षण देणं आणि कोर्टात टिकवणं आमची कमिटमेंट आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " माथाडी कामगारांकरिता स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी संघर्ष केला. अनेक लोकांनी मिळून माथाडी कामगारांना संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच आज अण्णासाहेब पाटलांकडे आपण माथाडी कामगारांचे दैवत म्हणून पाहतो. अण्णासाहेब पाटलांमुळेच मराठा समाजाची चळवळ उभी झाली. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपण १० टक्के आरक्षण दिलं. मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता. परंतू, सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण १० टक्के आरक्षण दिलं."
 
हे वाचलंत का? - अक्षय शिंदे काही संत नव्हता बलात्कारीच होता! एन्काऊंटर झाला तर पोलीसांचं कौतूकच केलं पाहिजे : शर्मिला राज ठाकरे

"आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. या मागण्या चूक आहेत असं मी म्हणणार नाही. पण कुठलीही मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय घेतल्यावर तो न्यायलयाने रद्द करायचा, अशी मराठा समाजाची फरफट होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "मराठा समाजाने सातत्याने विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीतचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, असे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण मिळाले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षण देणं आणि कोर्टात टिकवणं ही आमची कमिटमेंट आहे. आताच झालेल्या पोलिस भरतीमध्ये १० टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असू शकतं. पण मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे आणि समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. यादृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे."
 
"केवळ आरक्षण देऊन इतक्या मोठ्या मराठा समाजाला नोकऱ्या मिळू शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यांचं कल्याण होणं कठीण आहे. त्यासाठी आपण सारथीसारखी एक संस्था तयार केली. उच्च शिक्षणात, यूपीएससी, एमपीएससीमध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा, आयएएस, आयपीएस अधिकारी तयार व्हावेत म्हणून मी सारथीची निर्मिती केली. आज सारथीच्या माध्यमातून एकूण ५१ विद्यार्थी युपीएससी पास झाले. १२ आयएएस, १८ आयपीएस झाले आणि जवळजवळ ४८० एमपीएससीमध्ये पास होऊन विविध पदांपर्यंत गेलेत. सारथीची निर्मिती झाल्यामुळे आमचं कल्याण झालं, अशी त्यांची आज भावना आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे नाव बदलून मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, असं करणार आहे," असेही त्यांनी यावेळी सांगितले.