वसा 'बाप्पा साहित्य प्रसादा'चा

    24-Sep-2024
Total Views |
vasa bappa sahitya prasadacha


वाडा, विक्रमगड येथील शाळांच्या भेटीचे कारणच हे होते की, गणपतीबाप्पासाठी आलेले शैक्षणिक साहित्य येथील मुलांना भेट द्यायचे. पहिलीच भेट एवढी अविस्मरणीय होती की, त्यानंतर वेगवेगळे उपक्रम, कार्यशाळा, मनोरंजनाचे कार्य्रक्रम राबवू लागलो. त्यासाठी वाडा आणि विक्रमगडमधील शाळांना सातत्यानं भेट देऊ लागलो. साहित्य प्रसाद एक निमित्त आहे. या उपक्रमाने मुलांमध्ये शाळेची, अभ्यासाची गोडी निर्माण करणे हा एकच ध्यास आहे.

'बाप्पा साहित्य प्रसाद’ हा आमच्या ‘लेट्स इमॅजिन टूगेदर’ संस्थेचा उपक्रम दरवर्षी बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की सुरु होतो. सोशल मीडियावर पोस्ट बनविणे, मेसेज करणे. मग पोस्ट वाचून हा उपक्रम करायची इच्छा असलेले आमच्याशी जोडले जातात. अनंत चतुर्दशीनंतर वाडा आणि विक्रमगडमधील शाळांना भेट देऊन आम्ही हा बाप्पाचा साहित्य प्रसाद मुलांना देतो. या वेळेसही आधी विक्रमगडच्या शाळा आणि मग दुसर्‍या दिवशी वाडयाच्या शाळा करायचे ठरवले.

त्याआधी सर्वात मोठे आव्हान असते, ते सर्व ठिकाणांहून बाप्पा साहित्य प्रसाद एका ठिकाणी गोळा करायचे आणि मग त्याचे विलगीकरण करून शाळेच्या पटसंख्येप्रमाणे त्याचे बॉक्समध्ये पॅकिंग करणे. या कामीही मी, ओमकार, भूषण मोहिते, मानसी, मानसीची आई, शिखा, शिखाची आई, जानू, योगिता भाभी अशी टीम कामाला लागली. दहिसर, बोरिवली, मालाड, दादर, चर्चगेट, विरार या ठिकाणांहून साहित्य गोळा करायचे म्हणजे एक मोठे काम. मुलुंडच्या गौरव हिंगणेंनी आपला साहित्य प्रसाद ‘उबेर’ने पाठवून दिला. चार ते पाच दिवस सातत्याने ही कामगिरी फत्ते केल्यावर वाड्याला जाण्याचा दिवस उजाडला. प्रसाद इतका भरभरून आला होता की, या वेळेसही टेम्पो करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 21 शाळांना यावेळी बाप्पा साहित्य प्रसादाचा लाभ मिळणार होता. या शाळेतील गुरुजींशी बोलून कुठल्या शाळेत कधी जाणार, याचे जणू वेळाप्रत्रकच तयार करावे लागले.

जाण्याचा दिवस उजाडला. विक्रमगडच्या मागी पाडा शाळेला आम्ही पहिल्यांदा भेट देणार होतो. सर्वच शाळांतील गुरुजींनी गुगल लोकेशन पाठविले होते. मग काय? आपण व्यवस्थित पोहोचू, तशी काही अडचण येणार नाही, असे वाटले होते. पण आमच्या दोन गाड्यांपैकी एक गाडी एका मार्गाने, तर दुसरी गाडी दुसर्‍या मार्गाने असे शाळेत पोहोचलो आणि टेम्पोशी तर संपर्कच होत नव्हता. त्यात मोबाईलला रेंजपण येत नव्हती. पण शेवटी संपर्क होऊन टेम्पो पोहोचला.

गुरुजी वाट पाहात होते. मागी पाडा शाळेला पहिलीच भेट होती. मुलांनी टाळ्या वाजवून जोरदार आमचे स्वागत केले. गुरुजींनी आमच्या ‘लेट्स इमॅजिन संस्थे’ची आणि आमची ओळख करून दिली. ओमकारने नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. बाप्पा साहित्य प्रसाद म्हणजे काय आणि त्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा आहे आणि भरपूर अभ्यास करायचा आहे. साहित्य प्रसादाचे वाटप करून झाले. मुले उत्सुकतेने आणि कुतुहलाने हे न्याहाळत होती.
 
मागी पाडा शाळेनंतर सावरखिंड शाळेला भेट द्यायला निघालो. मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे शाळेत पोहोचायला थोडा उशीरच झाला होता. आपल्याकडे पाहुणे येणार, असे आधीच गुरुजींनी सांगितल्यामुळे सगळेच उत्सुकतेने वाट पाहत होते. मोठ्या स्क्रीनवर ‘थँक यु लेट्स इमॅजिन टूगेदर’ लिहिले होते. मुलांशी संवाद साधल्यानंतर आपलेपणाच्या भावनेने ते आमच्याशी एकरूप होतात, हा अनुभव आम्हाला नेहमीच येतो. त्यांच्याशी आपलेपणाने बोलून त्यांना समजून घेणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे महत्त्वाचे. मुलांचा आणि गुरुजींचा निरोप घेऊन आम्ही जांभेला भेट देण्यासाठी निघालो. आमची जेवणाची सोय शाळेतील गुरुजींनी केली होती. शाळेला आम्ही नेहमीच भेट देत असतो. त्यामुळे त्या शाळेतील मुले आणि आमची आता चांगलीच ओळख झाली आहेत. साहित्यवाटप करून झाल्यावर मुलांनी त्यांचे खास पारंपरिक तारपा नृत्यही सादर केले. मुलांच्या मनात आता आमच्याबद्दल आपुलकी आहे. त्यांना आमची त्यांच्यासाठी चाललेली तळमळ कळत आहे, हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवते.

खूप उशीर झाला होता. जांभे शाळेतून निघालो आणि मग ओमकार आणि मानसी टोपले पाडा शाळेत, तर मी, कानन भाभी, किन्नरी भाभी, विजय भाई असे सुकसाळे शाळेत गेलो. गेली सहा वर्षे सातत्याने या काही शाळांमध्ये आम्ही येत आहोत. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. मुलांस प्रसादाचे वाटप करून त्यांची गप्पा-टप्पा करून प्रस्थान केले, ते बोरसे पाडा शाळेत. एव्हाना 4.30 झाले होते. शाळा सुटायची वेळ झाली होती. पण गुरुजींनी पालकांना विनंती केली होती. काही शाळांमध्ये आम्ही जाऊ शकलो नाही, त्या शाळांतील गुरुजी त्यांची शाळा सुटल्यावर या शाळेत आम्हाला बाप्पा साहित्य प्रसाद घेण्यासाठी भेटणार होते. बोरेपाडा शाळेतील गुरुजींप्रमाणेच मुले ही हुशार आणि सतत काहीतरी नावीन्याच्या शोधात. गुरुजींनी पेटीवर सूर धरला आणि मुलांनी गुरुजींसोबत एकामागून एक गाणी सादर केली आणि तेही सूरात. येथील मुलांच्या अंगात कला आहे, फक्त त्यांना वाव आणि प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. रडेपाडा, सावरोली, भंडारपाडा शाळेतील गुरुजी बोरसेपाडा शाळेत आपले बाप्पा साहित्य प्रसाद नेण्यासाठी आले होते. कितीही प्रयत्न केला, तरी सगळ्या शाळा करणे शक्य होत नाही. पुढच्या वेळेस त्यांच्या शाळांना भेट देऊ, असे आम्ही सांगून दिलगिरी व्यक्त केली. पहिला दिवस कसा संपला, हे आम्हाला कळलेच नाही.

दुसर्‍या दिवशीच सुरुवात बालिवली शाळेपासून केली. बाप्पाचा साहित्य प्रसाद घेऊन ओमकारदादा आणि त्याची आई आपल्याकडे आले आहेत. बालिवली शाळेत प्रल्हाद सर मुलांशी संवाद साधत होते. आताही शाळेत मुलांसोबत बसून त्यांच्याशी संवाद साधण्यात जो आनंद मिळतो, त्यासाठी शब्दच नाहीत. बालिवली शाळेतील मुलांनी सांगितले की, ते या वहीत त्यांची गोष्ट, कविता लिहिणार आहेत. कोलीम सरोवर शाळेतील ओमकार नेहमीच एक तरी गाणे सादर करतो. त्या शाळेला भेट देऊन मग मोज शाळेत आलो. शनिवारी काही नवीन पाहुणे मंडळी आली होती. संदेश, शौनक, योगिता भाभी, शिखा आणि तिची आई. मोज शाळेतील मुलांनी आमच्यावर फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. या शाळेशी आमचे एक वेगळेच नाते तयार झाले आहे. एक ऊर्जा आम्हाला या मुलांपासून मिळते.

तुसे शाळेतही नेहमीप्रमाणेच प्रेमाने स्वागत झाले. त्यांच्यासोबत पारंपरिक नृत्यात आम्ही नेहमीच सहभागी होतो. एव्हाना दुपार झाली होती. तुसे शाळेजवळच वैशालीताईकडे जेवणाचा आस्वाद घेऊन निघालो. ते वरई बुद्रुकला जाण्यासाठी. वरई बुद्रुकच्या शाळेचा रस्ता हा रानावनातून जाण्याचा रास्ता. गुरुजींशी या शाळेबद्दल या गावाबद्दल चर्चा करत करत रानवाटेने जात होतो. शाळेतील मुले वाट पाहतच होती. गुरुजींच्या अथक प्रयत्नांनी या शाळेतील मुलांची झालेली प्रगती वाखाणण्यासारखी आहे. लाजरी बुजरी मुले आता धीट झाली आहेत. मुलांनी शाळेच्या परसात बाग केली आहेत. त्यात माठाची भाजी, काकडी, दुधी यांची लागवड केली आहे. त्यांची छोटीशी बाग आम्हाला सर्वांना दाखवली. मातीची केलेली खेळणी, मूर्ती यांचे प्रदर्शनही भरवले. एक एक उपजत कला या मुलांमध्ये ठासून भरलेली आहे. फक्त ती ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आणि सहकार्य देणे महत्त्वाचे आहे.

बाप्पा साहित्य प्रसादाचे वाटप करून झाले होते. निघण्याची वेळ झाली होती. गेला दीड महिना सुरु असलेली धावपळ संपली होती. यावर्षी या उपक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाली. बालिवली शाळेत पहिल्यांदा आम्ही बाप्पा साहित्य प्रसादच घेऊन आलो होतो. वाडा येथली आमची पहिलीच भेट. पहिलीच भेट एवढी अविस्मरणीय होती की, त्यानंतर वेगवगेळे उपक्रम, कार्यशाळा, मनोरंजनाचे कार्य्रक्रम राबवू लागलो. त्यासाठी वाडा आणि विक्रमगडमधील शाळांना सातत्याने भेट देऊ लागलो.

आमचे देणगीदार, आमचे हितचिंतक आमच्यासोबत आहेत, म्हणूनच एवढ्या शाळांना आम्ही सहकार्य करत आहोत. साहित्य प्रसाद एक निमित्त आहे. या उपक्रमाने मुलांमध्ये शाळेची, अभ्यासाची गोडी निर्माण करणे, हा एकच ध्यास आहे. आम्ही, मोहिते काका आणि संपदा अशा तिघांनी सुरु केलेला ’बाप्पा साहित्य प्रसादाचा वसा; आता 20 ते 22 जणांनी घेतला. पुढल्या वर्षी हा वसा अधिकाधिक लोकांनी घेवो आणि अधिकाधिक शाळांतील मुलांना बाप्पा साहित्य प्रसादाचा लाभ मिळो, हेच बाप्पापुढे नतमस्तक होऊन गार्‍हाणे!

पूर्णिमा नार्वेकर 
9820003834