मुंबई : बहुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो३ या ऍक्वा लाईनचा 'आरे ते बीकेसी' दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील १२.४४ किलोमीटरचा मार्ग ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.मुंबई मेट्रो ३ चा पहिला टप्पा बीकेसी ते आरे जेव्हीएलआर स्थानकापर्यंत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा पहिला टप्पा सुरु होईल. काही डॉक्युमेंटेशन सुरु आहे. तसेच काही चाचण्याही सुरु आहेत. या चाचण्या पूर्ण करून ही मार्गिका ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहितीही भिडे यांनी दिली.
सध्या सहा मिनिटांना एक ट्रेन
दरदिवशी भुयारी मेट्रोच्या ९६ फेऱ्या होतील, एकूण ९ गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. आठवड्यात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मेट्रो सुरु असणार आहे. तर रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ही मार्गिका सुरु होईल. ऑपरेशन सुरु होताच एकूण ४८ ट्रेन कॅप्टन ( चालक ) असून त्यापैकी १० महिला आहेत. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान १० रुपये तर कमाल ५० रुपये असे असणार आहे. पूर्ण क्षमतेने मार्गिका सुरु झाल्यावर तिकीटाचे दर कमाल ७० रुपये असतील. या प्रकल्पाची दर दोन मिनिटाला एक ट्रेन चालविण्याची क्षमता आहे. परंतू आता पहिल्या टप्प्यात ९ ट्रेन द्वारे बीकेसी ते आरे जेव्हीएलआर स्थानक सरासरी दर ६ मिनिटांनी एक ट्रेन अशी सेवा आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २२ ट्रेनद्वारे सरासरी दर ४ मिनिटांनी एक ट्रेन चालविण्यात येणार आहे.
पावसातही अखंड सेवा
मागील चार वर्षे मेट्रोचे हे भूमीगत बोगदे तयार आहेत. मागील १०० वर्षातील पावसाची आकडेवारी अभ्यासून हे बोगदे आणि स्थानक बांधण्यात आले आहेत. मात्र तरीही टनेलमध्ये थोडे जरी पाणी आले तरी त्याचा निचरा करण्यासाठी देखील यंत्रणा आहे. खुप जास्त पाऊस झाला तरी भुयारी मेट्रो बंद पडणार नाही.
कफ परेड ते बीकेसी फेज २ कधी ?
या मेट्रोचा कफपरेड ते बीकेसी हा फेज दोन मार्च ते मे २०२५पर्यंत पूर्ण होईल असा आमचा अंदाज आहे, या टप्प्यात मोठी स्थानके आहेत. त्यामध्ये वरळी आणि गिरगांव येथे मोठी आव्हाने आहेत. वरळी नाका आणि गिरगाव ही आव्हानात्मक स्थानके आहेत, त्यामुळे ही कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरता येणार ?
कॉमन मोबिलिटी कार्ड या मेट्रोला वापरता येणार आहे. ३० ऑक्टोबरपर्यत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधा तयार करण्यात येणार आहे.