धक्कादायक! मोबाईलवरून दिला महिलेला तीन तलाक

पतीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    24-Sep-2024
Total Views |

talaq
 
 
 
मुंबई : तीन तलाकला परवानगी नसताना ही महिलेला मोबाईलवरून तीन तलाक देणार्‍या पतीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे.

खोणी-तळोजा मार्गावरील पलावा गृहसंकुलात राहणारी तब्बसूम हिचा विवाह सांताक्रूझ, वाकोला येथे राहणार्‍या आरीफ शेख याच्यासोबत दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी झाला. आरीफ हा मूळचा लातूर येथील असून सध्या तो वाकोला येथे राहत आहे. आरीफचा तब्बसूमसोबत विवाह झाला, तेव्हा लग्नात हुंडा दिला गेला नाही, अशी आरीफच्या कुटुंबीयांची तक्रार होती. तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून “लग्नात हुंडा दिला नाही, आता तुझ्या आईवडिलांना सांग की, घर घेऊन द्या,” असा तगादा लावला. तसेच, छळ करू लागले. या त्रासाला कंटाळून तब्बसूम तिच्या आईवडिलांच्या घरी आली. तब्बसूमला मुलगी झाली. तिच्या पतीने सप्टेंबर २०२३ मध्ये मोबाईलवरून तीन तलाक दिला आहे. तब्बूसमच्या आई नूरजहा आणि वडील मिनाजउद्दीन यांनी आरीफची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला आरीफने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्याने दुसरे लग्न केले आहे.

पहिली पत्नी असताना आरीफ दुसरे लग्न करू शकत नाही. जोपर्यंत तब्बसूम ही खुलानामा देत नाही, तोपर्यंत तो दुसरे लग्न करू शकत नाही. तसेच, तीन तलाकला भारतात बंदी आहे. तब्बसूम हिने आपल्या आईवडिलांना घेऊन तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. यावर्षी दि. ११ सप्टेंबर रोजी या प्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. “पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी केलेला नाही,” असे तिचे म्हणणे आहे.पोलिसांकडून या प्रकरणी तपास करताना चालढकल केली जात असल्याचा आरोप तब्बसूम आणि तिच्या आईवडिलांनी केला आहे. “आरीफ यांनी तब्बसूम हिच्यासह तिची लहान मुलगी कुलसूम हिचा खर्च उचलावा. तिला पोटगी द्यावी,” अशी मागणी तब्बसूमच्या पालकांनी केली आहे.

तिहेरी तलाक प्रथा अन्यायकारी
तोंडी एकतर्फी तिहेरी तलाक ही प्रथा महिलांवर अन्याय करणारी आणि त्यांच्या संविधानात्मक अधिकारांचा संकोच करणारी आहे. त्यामुळे तोंडी तीन तलाक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच, फक्त तोंडी एकतर्फी तिहेरी तलाकवर बंदी आणून भागणार नाही. तर, बहुपत्नित्वावरही बंदी घातली पाहिजे. अन्यथा तलाक न देता, इस्लाममधील बहुपत्नित्वाच्या अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो. भारतीय संविधानास अपेक्षित असलेला ‘समान नागरी कायदा’ जोपर्यंत अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत असे प्रकार होत राहतील. मोबाईल तलाक देण्याचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे. फोनवरून तलाक देणार्‍या पतीवर योग्य ती कारवाई करावी.
- डॉ. शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ

शरीयतमध्येदेखील एकाचवेळी तीन तलाक देणे अनुचित
तीन तलाक दिलेल्या महिलेला न्याय मिळवून देणे अत्यावश्यक आहे. शरीयतमध्येदेखील एकाचवेळी तीन तलाक देणे अनुचित मानले गेले आहे आणि तिहेरी तलाकविरोधी नवीन कायदा महिलांच्या हक्कांचे संरक्षण करतो. या कायद्यामुळे मुस्लीम महिलांना तत्काळ तलाकच्या अन्यायकारक प्रथेतून मुक्तता मिळते. संबंधित महिलेच्या सन्मान व हक्कांसाठी तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.
- रिधा रशिद, महामंत्री, अल्पसंख्याक मोर्चा, भाजप