"दलितविरोध हेच काँग्रेसचे धोरण." केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात

    24-Sep-2024
Total Views |
 
amit rally
 
 
नवी दिल्ली : “दलितविरोध हेच काँग्रेसचे धोरण आहे. त्यामुळेच हरियाणात कुमारी शैलजा आणि अशोक तन्वर या दलित नेत्यांचा अपमान केला जातो. त्यामुळे आरक्षणाचे संरक्षण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात.” असा केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी म्हटले आहे. हरियाणातील एका प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, “काँग्रेस पक्ष हा दलितविरोधी पक्ष आहे. काँग्रेसने नेहमीच दलित नेत्यांचा अपमान केला आहे. अशोक तन्वर असोत किंवा कुमारी शैलजा काँग्रेसने सर्वांचा अपमान केला आहे. जेव्हा काँग्रेसची सरकारे होती, तेव्हा दिल्लीच्या जावयाला खूश करण्यासाठी हरियाणातील शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकल्या जात होत्या. हुड्डा सरकारमध्ये तर व्यापार्‍यांचा खूप प्रभाव होता, मुलगा-सासर्‍यांचा प्रभाव होता आणि भ्रष्टाचार्‍यांचा प्रभाव होता. मात्र, भाजपने व्यापार्‍यांचे आणि जावयाचे सरकार संपवले,” असे शाह म्हणाले.

यादरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर ते म्हणाले, “संपूर्ण देशाला शीख गुरुंचा अभिमान आहे. प्रत्येक घरात नानक देव महाराजांची प्रतिमा असते. मात्र, राहुलबाबांच्या मते शीखांना भारतात पगडी घालण्याचे आणि कडे घालण्याचे स्वातंत्र्य नाही. शीखांचा अपमान करण्याचा तर काँग्रेसचा जुना इतिहास आहे. काँग्रेसच्याच कार्यकाळात दिल्लीत हजारो शीखांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या,” अशीही आठवण केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी करून दिली.