'कोल्डप्ले'च्या तिकिटात ५०० कोटींचा काळाबाजार - 'भाजयुमो' मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांचा गंभीर आरोप

    24-Sep-2024
Total Views |

coldplay
 
मुंबई : 'कोल्डप्ले' या ब्रिटिश रॉक बँडच्या तिकिट बुकींगमध्ये तब्बल ५०० कोटींचा काळाबाजार झाल्याचा गंभीर आरोप 'भाजयुमो' मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

'दै. मुंबई तरुण भारत' संवाद साधताना तेजिंदर सिंह तिवाना म्हणाले, जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या 'कोल्डप्ले कॉन्सर्ट'च्या तिकिटांची विक्री ऑनलाइन माध्यमातून करण्यात येत आली. मात्र, बुकींग सुरू होताच संकेतस्थळ आणि संबंधित कंपनीचे अॅप नियोजनबद्धरित्या क्रॅश करण्यात आले. त्यानंतर काळ्याबाजारात तिकीट विक्री सुरू करण्यात आली. ३ ते ६ हजारांचे तिकिट सध्या ७ ते ८ लाखांना विकले जात आहे. ही 'कोल्डप्ले कॉन्सर्ट'च्या चाहत्यांची शुद्ध फसवणूक आहे.

काळ्याबाजारात एजंटद्वारे या शोची तिकिटे अव्वाच्या सव्वा दराने विकली जात आहेत. याआधीही क्रिकेट विश्वचषकादरम्यान या कंपनीद्वारे अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तेजिंदर सिंह तिवाना यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त यांना पत्र लिहून केली आहे. तसेच आतापर्यंत झालेली 'कोल्डप्ले' तिकिटांची विक्री रद्द करण्यात यावी, जेणेकरून चाहत्यांची फसवणूक थांबवता येईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.