मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Meeting on Tirupati Controversy) तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीयुक्त तुपाचा वापर केल्याच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. तिरुपती येथे दि. २३ सप्टेंबर रोजी विहिंपची केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सदस्यांनी झालेल्या बैठकीत यासंदर्भात ठराव पारित केला आहे. त्यासोबतच या घटनेचा निषेध व्यक्त करत हिंदू मंदिरांच्या स्वायत्ततेची मागणी देखील करण्यात आली आहे.
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणीसुद्धा विहिंपकडून करण्यात आली आहे. या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना कायद्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, भविष्यात अशा गुन्ह्यांना प्रतिबंधक म्हणून काम केले पाहिजे. असे मत यावेळी व्यक्त केले आहे.
हे वाचलंत का? : भारतीय मुस्लिम महिलेने UNHRC मध्ये CAA चे केले समर्थन
मिळालेल्या माहितीनुसार विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सदस्य तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या प्रकरणामुळे अत्यंत दुखावले आहेत. या गंभीर अपमानाचा आणि हिंदू धर्माला झालेल्या दुखापतीचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हे घृणास्पद कृत्य जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावनांचे उल्लंघन करतेच पण हिंदूंच्या सर्वात आदरणीय तीर्थक्षेत्रांपैकी एकाचे पावित्र्य देखील कमी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विहिंप केंद्रीय मार्गदर्शक मंडळच्या मते मंदिराच्या कामकाजात सरकारच्या हस्तक्षेपाचा तसेच मंदिर व्यवस्थापनातील अधिकार पदांवर इतर धर्मातील व्यक्तींच्या नियुक्तीचा हा थेट परिणाम आहे. अशा कृतींमुळे हिंदू धार्मिक संस्थांची स्वायत्तता नष्ट तर होतेच परंतु भक्तांमध्ये अविश्वासाची भावनाही निर्माण होते. त्यामुळे राज्य सरकारांनी हिंदू मंदिरांवरील त्यांचे नियंत्रण ताबडतोब बंद करावे आणि हिंदू समाजाला स्वतःच्या धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन करू द्यावे, अशी मागणी विहिंपकडून करण्यात आली आहे.
धार्मिक परिषद मंडळाची स्थापना
मंदिरे पुन्हा श्रद्धा आणि अध्यात्माची केंद्रे बनली पाहिजेत, ज्यांचे व्यवस्थापन हिंदू परंपरा समजणाऱ्या आणि आदर करणाऱ्या समर्पित व्यक्तींनी केले पाहिजे. यावेळी मंदिरे हिंदू समाजातील सर्व घटकांच्या गरजा पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी धार्मिक परिषद मंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हे मंडळे संत, हिंदू संघटना, विद्वान आणि भाविक यांच्या प्रतिनिधींनी बनवलेले असेल व ते मंदिर व्यवस्थापनासाठी लोकशाही आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन सुनिश्चित करेल.
हिंदू मंदिरांचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे
विहिंप केंद्रीय मार्गदर्शक मंडळ सर्व हिंदू मंदिरांचे पावित्र्य राखण्याच्या महत्त्वावर भर देते. केंद्र आणि राज्य सरकारांना त्यांना याबाबत विनंती केली आहे की, धार्मिक विटंबना किंवा मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. हिंदू भाविकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे.