"पोलिसांच्या जीवावर उठलेल्या बलात्काऱ्याविषयी विरोधकांना..."; मंत्री मुनगंटीवारांची टीका
24-Sep-2024
Total Views |
नागपूर : पोलिसांच्या जीवावर उठलेल्या बलात्काऱ्याविषयी विरोधकांना सहानुभूती वाटते हे आश्चर्यजनक आहे, अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असताना त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवणं आणि आपण प्रत्यक्षदर्शी नसताना असा कल्पनाविलास करणं हे आश्चर्यजनक आहे. हजारों लोक या बलात्कारी व्यक्तीच्या विरोधात एकत्र येऊन त्याला फाशी द्या म्हणत होते. तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला. आता मात्र याचं राजकारण करण्यात येत आहे."
"अक्षय शिंदेला फाशी द्या असे महाविकास आघाडीचे लोक सांगत होते. पण आता तो पोलिसांच्या जीवावर उठला असताना त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. पोलिसांच्या जीवावर कुणी उठलं असताना ते वाट पाहत बसणार का? विरोधकांना आता तर्कवितर्क लावण्याचं नवीन व्यसन लागलं आहे. कसाबच्या बंदुकीतून हेमंत करकरे शहीद झाले नाही, असे म्हणणारे हे लोक आहेत. ते मतांसाठी काय करतील याचा काही भरवसा नाही," अशी टीका त्यांनी केली आहे.