संजय राऊत मुर्ख माणूस! घटनेची जाणीव नसल्याने बेताल वक्तव्ये करतात
संजय शिरसाटांचा घणाघात
24-Sep-2024
Total Views |
मुंबई : संजय राऊत मुर्ख माणूस आहे. त्यांना घटनेची जाणीव नसल्याने ते बेताल वक्तव्ये करतात, असा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटवरून संजय राऊतांनी टीका केली होती. यावर शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
संजय शिरसाट म्हणाले की, "आरोपीने पोलिसांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिले. अल्पवयीन मुलीवर केलेला अत्याचार हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. एवढं होऊनही त्याने बंदूक घेऊन गोळीबार केला आणि त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यावर त्याचा मृत्यू झाला. तरीसुद्धा याबाबतची सखोल चौकशी केली जाणार आहे. कायदा सर्वांसाठी आहे परंतू, जो आरोपी नाही त्याला आरोपी बनवण्यासाठी कायदा नाही. त्यामुळे कायद्याचा वापर करताना या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्या," असे ते म्हणाले.
गृहखातं हे अत्यंत सक्षम असून चांगलं काम करत आहे. समाजात अशा प्रवृत्ती आढळल्यावर त्यांना शासन करणं हे सरकारचं काम आहे. परंतू, गृहखात्याच्या आशीर्वादातून काही घडलं असा हा प्रकार नाही. त्यामुळे आरोप करताना केवळ ताशेरे ओढणं हे विरोधी पक्षांचं काम आहे.
संस्थाचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊत मुर्ख माणूस आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ९० टक्के संस्था आहेत. तिथे काही घडलं तर शरद पवारांना जबाबदार धरायचं का? संस्था हे संस्थेचं काम करत असते. पण म्हणून काही ज्यांच्या नावावर संस्था आहे त्यांना आपण आरोपी करत नाहीत."
जरांगेंच्या आंदोलनाहून लक्ष भरकटवण्यासाठी हे केलं आहे, अशीही टीका संजय राऊतांनी केली होती. यावर शिरसाट म्हणाले की, "जरांगेंचं आंदोलन समाजासाठी आहे. ही घटना वेगळी आहे. प्रत्येक घटना वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांना एकत्र करण्याचा संबंधच येत नाही. या मुर्खांना जाणीव नसल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करतात," असेही ते म्हणाले.