सरकारने जखमी पोलिस आधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा! प्रकाश आंबेडकरांची मागणी

    24-Sep-2024
Total Views |
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : सरकारने जखमी पोलिस आधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदूक घेत गोळीबार केला. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला असून पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "बदलापूरच्या मुलींवरील अतिप्रसंगातील आरोपीला शोधण्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं सरकार कमी पडलं. अनेक दिवस आरोपींना पकडण्यात आलेलं नाही. पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याचे मदतनीस कसे मोकळे सुटतील, असा प्रयत्न सुरु होता. आता पोलिस आरोपीला दुसऱ्या चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने बंदूक हिसकावून गोळ्या झाडल्या. यात एक पोलिस जखमी झाला, अशी माहिती आहे. त्यामुळे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट शासनाने प्रकाशित करावा. जेणेकरून त्याला नेमकी कुठे गोळी लागली, हे लोकांना कळेल."
 
हे वाचलंत का? -  "अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला..."; पत्रकार परिषद घेत पोलिसांचा मोठा खुलासा
 
"तसेच नेमकं कशाच्या तपासासाठी आरोपीला घेऊन जाण्यात आलं याचाही खुलासा व्हायला हवा. जर या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिस आणि शासनाकडून आला नाही तर मग कुणालातरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेला का? अशी चर्चा कायम राहिल. त्यामुळे शासनाने संशयाच्या भोवऱ्यात न अडकता लोकांसमोर वस्तुस्थिती मांडावी," असेही ते म्हणाले.