ऑस्कर्ससाठी 'लापता लेडिज'च का? सिलेक्शन कमिटीने दिलं उत्तर

    24-Sep-2024
Total Views |

lapata ladies 
 
 
मुंबई : ऑस्कर २०२५ साठी भारताकडून अधिककृत प्रवेशिका मिळवलेल्या किरण राव दिग्दर्शित लापता लेडिज या चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. किरण राव हिचा हा चित्रपट दिग्दर्शिका म्हणून पहिलाच आणि त्याच चित्रपटाला थेट ऑस्कर नॉमिनेशन मिळणं म्हणजे अत्यानंदच. आमिर खानची निर्मिती असलेला लगान नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे जो ऑस्करला पोहोचला आहे. त्यामुळे आमिर खानचेच चित्रपट ऑस्करला का जातात असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
 
परंतु, आता ऑस्कर २०२५ साठी’ लापता लेडिज’ का पाठवला याचं स्पष्टीकर भारतीय फिल्म फेडरेशनने सोमवारी जाहीर केलं आहे. ते म्हणाले की, 'लापता लेडीज' या चित्रपटाची २०२५ मध्ये ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड २९ चित्रपटांच्या यादीतून केली. या २९ चित्रपटांच्या यादीत 'अट्टम', 'कल्की 2898 एडी' आणि 'ॲनिमल' या चित्रपटांचाही समावेश आहे.
आसामचे फिल्ममेकर आणि डायरेक्टर जाहनू बरुआ यांनी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरी टीम लीड केली होती. जाहनू बरुआ यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "ज्युरींना प्रत्येक आघाडीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारा योग्य चित्रपट पाहावा लागेल. विशेषत: त्या चित्रपटात भारताची समाजव्यवस्था आणि त्याचं स्वरूप दाखवलं पाहिजे. भारतीयत्व खूप महत्वाचं आहे आणि लापता लेडीजनं या आघाडीवर खूप चांगलं काम केलं आहे."
 
बरुआ पुढे म्हणाले की, "भारताचं प्रतिनिधित्व करणारा सर्वात अचूक चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवला जाणं महत्त्वाचं आहे. २९ नामांकन मिळालेल्या चित्रपटांपेक्षाही चांगला चित्रपट असू शकतो. पण ज्युरी त्यांना दिलेल्या यादीतूनच निवडू शकतात, बरोबर ना? अशा परिस्थितीत, ज्युरी टीमला लापता लेडीज हा चित्रपट जेतेपदासाठी योग्य वाटला.”
 
 
 
लापता लेडिज या चित्रपटात प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांसारखे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, लग्नानंतर बेपत्ता झालेल्या दोन महिलांची ही कथा आहे. निर्मल प्रदेश नावाच्या काल्पनिक राज्यात, फुल आणि पुष्पा या दोन नववधू आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान चुकून त्यांची अदलाबदल होते. एकीला वेगळाच नवरा स्वतःची नववधू म्हणून सोबत घेऊन जातो, तर दुसरी रेल्वे स्टेशनवरच आपल्या नवऱ्याची वाट पाहात थांबते. पोलीस अधिकारी किशन या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतात. त्यानंतर खरी नववधू शोधण्यासाठी जी धमाल घडते ती पाहण्यासारखी आहे.