"अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला..."; पत्रकार परिषद घेत पोलिसांचा मोठा खुलासा

    24-Sep-2024
Total Views |
 
Akshay Shinde
 
ठाणे : अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, असा खुलासा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी केला आहे. सोमवारी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली आहे.
 
शैलेश साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बाल लैंगिक अत्याचारातील अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. यासाठी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकातील पोलिस अधिकारी न्यायालयाचे ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या सदर आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तिथून कायदेशीरपणे त्याला घेऊन येत असताना आरोपीने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला."
 
"यासंदर्भात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार २६२, १३२, १०९, १२१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत आरोपीसंदर्भात अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय या दोन्ही प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली असून ते उपचार घेत आहेत. तसेच इतर पोलिसदेखील उपचार घेत आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली.