नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यात इन्व्हेस्ट इंडिया कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता करण्यात आली असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सिंगापूर येथे इन्व्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयाच्या माध्यमातून गुंतवणुकीतील भागीदारी वाढवण्यासाठी आणि जागतिक गुंतवणूकदारांना भारतासोबत जोडण्याचे मार्ग सोपे करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
दरम्यान, सिंगापूर कार्यालय हे इन्व्हेस्ट इंडियाचे पहिले परदेशातील कार्यालय आहे. ४ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी सिंगापूर दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरमध्ये इन्व्हेस्ट इंडिया कार्यालयाची स्थापन करण्याची घोषणा केली होती. जागतिक गुंतवणूकदारांना भारतासोबत जोडण्याकरिता वचनबद्धतेला बळकटी मिळणार असून सिंगापूर कार्यालय भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी संपर्काचे एक समर्पित केंद्र म्हणून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवेल.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, सिंगापूर भारतासाठी एक प्रमुख धोरणात्मक भागीदार असून कार्यालय सिंगापूर आणि आसियान क्षेत्राशी आर्थिक सहकार्य मजबूत करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय चिन्हांकित करते. येत्या काही महिन्यांत जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या गतिमान आणि वाढत्या अर्थव्यवस्थेत अखंडीत प्रवेश प्रदान करण्याच्या उद्देशाने आम्ही परदेशात अधिकाधिक इन्वेस्ट इंडिया कार्यालये उघडण्याची योजना आखत आहोत, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.