तामिळनाडू सरकारकडून अशा पथसंचलनास विरोध होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या प्रकरणी न्यायालयांनी कान खेचल्यानंतर संचलनास अनुमती देण्यात आल्याची उदाहरणे घडली आहेत. आताही पथसंचलनास द्रमुक आघाडी सरकारने अनुमती नाकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परवानगी मिळावी यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तामिळनाडूमधील द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेला आपला दुस्वास पुन्हा एकदा प्रकट केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातील विविध शाखांकडून विजयादशमीच्या निमित्ताने पथसंचलनाचे आयोजन करण्यात येत असते. पण, तामिळनाडू सरकारकडून अशा पथसंचलनास विरोध होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या प्रकरणी न्यायालयांनी कान खेचल्यानंतर संचलनास अनुमती देण्यात आल्याची उदाहरणे घडली आहेत. आताही पथसंचलनास द्रमुक आघाडी सरकारने अनुमती नाकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परवानगी मिळावी यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
येत्या ६ ऑक्टोबर रोजी तामिळनाडू राज्यामध्ये ५८ ठिकाणी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पण, सरकार आणि पोलिसांनी त्यास अनुमती नाकारली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी झाली. त्यानिमित्ताने त्या दिवशी देशभर पथसंचलनांचे आयोजन करण्यात येते. पण, संघविरोधी आणि सनातन धर्मविरोधी भूमिका घेणार्या तामिळनाडू सरकारचा अशा पथसंचलनास विरोध आहे. संचलनास अनुमती देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंती तिरुपूर येथील संघाचे कार्यकर्ते एम. ज्योतिप्रकाश आणि के. सेतुराज यांनी न्यायालयास केली आहे. अशा कार्यक्रमासंदर्भात गेल्या ५ जानेवारी रोजी न्यायालयाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या, त्यांच्याशी सुसंगत अशीच आमची विनंती आहे, असे अर्जदारांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. प्रशासन आणि पोलीस यांना ही सर्व माहिती देऊनही त्यांच्याकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने या प्रकरणी न्यायालयाने वेळीच हस्तक्षेप करावा, असे अर्जदारांनी म्हटले आहे. न्या. जी. जयचंद्रन यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शासन आणि पोलिसांना अर्जाचा फेरविचार करण्यासाठी वेळ दिला. आता या संदर्भातील सुनावणी आज मंगळवार, २४सप्टेंबर रोजी होणार आहे.
अनुमती मिळण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल बोलताना भाजप आ. वनाती श्रीनिवासन यांनी तामिळनाडू सरकारवर टीका केली आहे. ’तामिळनाडू सरकार फॅसिस्ट दृष्टिकोन अवलंबित आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे. अन्य राज्यांमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने संघाची पथसंचलने काढली जात असताना, तामिळनाडू सरकार त्यास सातत्याने विरोध करीत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. न्यायालयीन आदेशांचा अवमान केल्याबद्दल संघाने अवमान याचिकाही दाखल केल्या होत्या, हे आ. श्रीनिवासन यांनी निदर्शनास आणून दिले. ’घटनेने जो अधिकार दिला आहे, त्या अधिकारांची पायमल्ली ‘इंडी’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या द्रमुककडून केली जात आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. ‘’इंडी’ आघाडी आपणास घटनेचे रक्षक असल्याचे समजत आहे. पण, त्या आघाडीच्या घटक पक्षाकडूनच घटनेने जे हक्क दिले आहेत, त्यांचा अनादर केला जात आहे,” असेही वनाती श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.
थायलंडमध्ये उत्साहात गणेशोत्सव!
थायलंडमध्ये यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, थायलंड यांच्या पुढाकाराने राजधानी बँकॉक आणि पटाया येथे आयोजित गणेशोत्सवात त्या देशातील भारतीयांसह स्थानिक जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. गेल्या १७ वर्षांपासून त्या देशात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. एकत्वाची भावना जोपासली जावी, सांस्कृतिक सलोखा निर्माण व्हावा आणि भक्तिभावना वाढीस लागावी, या हेतूने हा गणेशोत्सव त्या देशात सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी १४ आणि १५ सप्टेंबर असे दोन दिवस बँकॉकच्या मध्यवर्ती वस्तीत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पटाया येथील गणेशोत्सवाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष देव के. सिंह यांनी केले होते. दोन दिवसांच्या या उत्सवात भारतीय नागरिकांच्याबरोबरच थायलंडची जनता आणि पर्यटक सहभागी झाले होते. भारतीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडविणार्या या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, भक्ती संगीताचे कार्यक्रम योजण्यात आले होते. तसेच, सामाजिक सेवेचे उपक्रमही हाती घेण्यात आले होते. सांस्कृतिक परंपरा दृढ करण्यासाठी, एकत्वाची मूल्ये जपली जावीत असे, हेतू पुढे ठेवून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कलाकार आणि व्यावसायिक कलाकारांनी या उत्सवात आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या उत्सवात थायलंडमधील ज्येष्ठ अधिकारी, भारतीय, श्रीलंका, तिमोर लेस्ते यांच्या वकिलातीतील अधिकारीही सहभागी झाले होते. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी असे दोन दिवस हा उत्सव चालला होता. १६ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आणि गणरायास निरोप देण्यात आला. थायलंडमध्ये हिंदू संस्कृतीची पाळेमुळे अनेक शतकांपासून रुजलेली आहेत. त्या प्राचीन संस्कृतीचे स्मरण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तेथील जनतेला झाले.
बांगलादेश : दुर्गापूजेसाठी पाच लाखांची खंडणी!
बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील अल्पसंख्य हिंदू समाजास अनेक प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. नव्या राजवटीत धर्मांध मुस्लिमांचा प्रभाव वाढल्याने हिंदू समाजावरील अत्याचार वाढत चालले आहेत. दुर्गापूजा हा बंगालमधील हिंदू समाजाचा एक महत्त्वाचा उत्सव. प. बंगालप्रमाणे बांगलादेशमधील हिंदू समाज हा उत्सव साजरा करीत आला आहे. पण, अलीकडील काळात बांगलादेशमधील दुर्गापूजा उत्सवांवर धर्मांध हल्ले करू लागले आहेत. आता त्या देशातील धर्मांध मुस्लिमांनी प्रत्येक दुर्गापूजा समितीला पाच लाख रुपये खंडणी देण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. ज्यांना या वर्षी दुर्गापूजा उत्सव साजरा करायचा असेल, त्या प्रत्येक मंडळाने पाच लाख रुपये खंडणी द्यावी, असे या धर्मांध गटांनी म्हटले आहे. पाच लाख रुपये खंडणी न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या धर्मांध गटांनी दिला आहे. या खंडणीची माहिती प्रशासनास दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला आहे. शेख हसीना यांच्या काळातही दुर्गापूजा कार्यक्रमांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतच होते. आता नव्या राजवटीत हिंदू समाजावर होणार्या अत्याचारांमध्ये आणखी भर पडली आहे. जी खंडणी मागितली आहे, ती न दिल्यास पूजा समितीच्या सदस्यांच्या कुटुंबियांना ठार करण्यात येईल, असेही धमकाविण्यात आले आहे. या प्रकाराविरुद्ध केवळ भारत सरकारनेच नव्हे; तर, समस्त हिंदू समाजाने आवाज उठविण्याची आवश्यकता आहे.
९०० कुकी अतिरेक्यांची भारतात घुसखोरी!
मणिपूरमध्ये कुकी अतिरेकी सक्रिय असून त्यांच्याकडून आधुनिक सामग्रीचा वापर करून मैतेई समाजावर हल्ले केले जात आहेत. कुकी अतिरेक्यांनी ड्रोनचा वापर करून हल्ले करण्याची घटना अलीकडेच निदर्शनास आली आहे. आता म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेक्यांनी मणिपूरमध्ये घुसखोरी केली असून, या अतिरेक्यांकडून येत्या २८ सप्टेंबरच्या दरम्यान हल्ले केले जाण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा सल्लागार कुलदीपसिंह यांनी म्हटले आहे. ‘’पोलिसांनी या घुसखोरीची गंभीर दखल घेतली असून, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक ती पावले टाकण्यात आली आहेत,” असेही कुलदीपसिंह यांनी म्हटले आहे. म्यानमारच्या सीमेलगत असलेल्या फेर्ज्वाल, चुराचंदपूर आणि काम्जोंग या भागात सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल्सचे जवान कडक पहारा देत आहेत, अशी माहितीही कुलदीपसिंह यांनी दिली. संबंधित भागात ड्रोनविरोधी यंत्रणाही बसविण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या मोहिमेत अत्याधुनिक स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा सल्लागारांनी २८ सप्टेंबर रोजी हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे. पण, असे संभाव्य हल्ले होण्याआधीच या कथित ९०० कुकी अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात सरकारला यश यावे, अशी अपेक्षा!
लेखक - दत्ता पंचवाघ