मविआला मोठा धक्का! कर्जत-जामखेडमधील विश्वासू नेते भाजपमध्ये दाखल

येत्या विधानसभेत कर्जत जामखेडची जागा ही भाजपची असेल : फडणवीस

    23-Sep-2024
Total Views |
 
BJP
 
मुंबई : शरद पवार गटाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात आणि उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोमवारी हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
 
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची आहे. याच विस्थापितांचे नेतृत्व करणारे मधुकर राळेभात आणि त्यांच्या टीमने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यांच्यापैकी कुणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाही. जमिनीवर काम करून आणि एकएक व्यक्ती जोडून हे नेतृत्व तयार झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे रामभाऊ शिंदे आणि आता आलेल्या टीममुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. सगळी ताकत एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेत निर्णायकी लढावी लागेल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - पुण्यातील मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
 
कर्जत जामखेडची जागा ही भाजपचीच असेल!
 
"सामान्य माणसाचं दु:ख हे सामान्य माणसालाच समजतं. तसेच त्या दु:खावर फुंकर कशी मारावी हेही त्यांनाच कळतं. त्यामुळे आपल्यात वावरणारे नेते असे असतील तरच मतदारसंघातील जनतेला न्याय मिळतो. महाराष्ट्रात आपलं सरकार धडाडीने निर्णय घेत आहे. हे परिवर्तन करणारे निर्णय आहेत. आपण पाण्याच्या थेंबाथेबाबासाठी संघर्ष करत असतो. पण आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी मंजुरी दिली. तसेच टेंडरही काढले. पाण्यासाठी आपापसांतले संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा जलमय करण्याचे काम झाले आहे. बाळासाहेब विखे पाटील सातत्याने मागणी करत होते. मात्र काँग्रेसचे सरकार ते पूर्ण करू शकले नाही. पण आपल्या सरकारने ते पूर्ण करून दाखवलं आणि येत्या काळात हा सगळा भाग पाणीदार करणार आहे. निर्णयांची फार मोठी यादी आहे. आपल्या सरकारवर जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार. या सरकारमध्ये कर्जत जामखेडची जागा ही भाजपची असेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.