मद्रास उच्च न्यायालयाच्या ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’संबंधी कंटेंट डाऊनलोड करणे आणि पाहणे गुन्हा ठरत नाही, या एका खटल्याअंती दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कालच्या सुनावणीत अवैध ठरविले. त्यानिमित्ताने ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या दुष्टचक्राचे आकलन करणारा हा लेख...
जगभरात दर सेकंदाला तब्बल २८ हजार २५८ वापरकर्ते विविध माध्यमांतून पॉर्नोग्राफी बघतात. त्यापैकी ६९ टक्के नेटकरी त्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. अशी पॉर्नोग्राफीला वाहिलेली तब्बल ४० लाख संकेतस्थळे मायाजालावर उपलब्ध असून, एकूण संकेतस्थळांपैकी त्यांचे प्रमाण १२ टक्के आहे. त्यातही एका (कु)प्रसिद्ध पॉर्नोग्राफीच्या एका संकेतस्थळाला मासिक भेट देणार्यांची संख्या आहे ५४९ कोटी... पॉर्नोग्राफीसंबंधी प्रारंभीच ही चक्रावणारी आकडेवारी मांडण्याचे कारण एवढेच की, देशविदेशातील अश्लीलतेच्या या जगाची व्याप्ती वाचकांच्या लक्षात यावी. त्यातही ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ हा अतिशय गंभीर विषय. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने काल अशाप्रकारे ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ संबंधी कंटेंट पाहणे, तो डाऊनलोड करणे अथवा इतरांना पसरविणे हा कायदेशीर गुन्हाच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तसेच, त्याअनुषंगाने सरकारलाही कायद्यामध्ये बदल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
जानेवारी महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ डाऊनलोड करुन पाहणे हा ‘पोक्सो’ आणि आयटी कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा ठरु शकत नसल्याचे म्हटले होते. एका २८ वर्षीय व्यक्तीला मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणी तेव्हा कायदेशीर दिलासा होता. परंतु, हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सरन्यायाधीशांसह अन्य न्यायमूर्तींनीही एकमुखाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खर्या अर्थाने पथदर्शी ठरावा. या निर्णयामुळे ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ संबंधी कुठल्याही प्रकारचा कंटेंट तयार करणे, डाऊनलोड करणे, पाहणे अथवा अन्य कुणाबरोबरही शेअर करणे, हा कायदेशीर गुन्हाच. अशा गुन्ह्याखाली ‘पोक्सो’ अंतर्गत आरोपीला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा अधिक दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे साहजिकच अशा गुन्ह्यांवर चाप बसायला मदत होईलच. शिवाय, अशा गुन्ह्यांची पोलीस यंत्रणाही अधिक गांभीर्याने दखल घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’सारख्या संवेदनशील आणि फारशा चर्चेत नसलेल्या विषयाला वाचा फोडली गेली. कारण, हा प्रकार फक्त अमेरिका-युरोपातील पाश्चिमात्त्य देशांपुरता मर्यादित आहे, असा काहींचा गैरसमज. पण, तसे अजिबात नाही. भारतातही अशाप्रकारे छुप्या पद्धतीने अल्पवयीन मुलांचे अथवा मुलींचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ तयार करुन हजारो रुपयांना त्यांची विक्री केली जाते. अशाप्रकारे, लहान मुलांचे शोषण करणारे किंवा तशा प्रकारच्या व्हिडिओतून, फोटोंमधून लैंगिक सुखाचा आनंद घेण्याच्या या अश्लाघ्य प्रकाराला ‘पेडोफिलिया’ आणि अशा माणसांना ‘पेडोफाईल’ असे संबोधले जाते. या मानसिक आणि शारीरिक विकृतीमुळे जगभरात कित्येक कोवळ्या मुलामुलींचे आयुष्य आज उद्ध्वस्त झाले आहे. कारण, लैंगिक शोषणाला बळी पडणार्या अशा लहान मुलांवर या अत्याचाराचा केवळ शारीरिकच नव्हे तर, प्रचंड मानसिक, भावनिक आघातही होतो. यामुळे नात्यांवरचा, लोकांवरचा आणि एकूणच समाजावरील विश्वास अशी मुलं गमावून बसतात. आपली नेमकी ‘लैंगिक ओळख’ (सेक्शुअल आयडेन्टिटी) कोणती, या द्वंद्वांतून यांपैकी काही अत्याचारग्रस्त मुले तर आपल्या आयुष्याचाच शेवट करतात. एवढेच नाही तर, ही लहान मुले शरीरविक्रेय, ड्रग्ज आणि गुन्हेगारीविश्वासाठीही अगदी सहज सावज ठरतात. बरेचदा तर, अशाप्रकारे लहान मुलामुलींवर अत्याचार करणारे त्यांचेच पालक अथवा जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी असल्याचेही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
आजच्या सोशल मीडियाच्या जगातही अशा एकट्या, दुर्लक्षित मुलांना अचूक हेरुन, त्यांची रीतसर फसवणूक-पिळवणूक केली जाते. ‘ब्लॅकमेलिंग’च्या माध्यमातून अशा राक्षसी कृत्यांना ही मुले अलगद बळी पडतात आणि एकदा का या दुष्टचक्रात ही मुले ओढली गेली की, त्या नरकातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सहजासहजी गवसत नाही. मग ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या चक्रव्यूहात ओढलेली यापैकीच काही कोवळी मुले भविष्यात कायमस्वरुपी ‘पॉर्नोग्राफी’च्या इंडस्ट्रीचाच कधी भाग होऊन बसतात, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. आजघडीला जर्मनी हा देश ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या निर्मितीमध्ये आघाडीवर तर, अमेरिका हा देश असा कंटेंट बघण्याच्या बाबतीत जगात पुढे असल्याचे आकडेवारी सांगते. बरेचदा, अशा संकेतस्थळांवर कारवाईचाही बडगा उगारला जातो. भारतानेही यापूर्वीच ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ संबंधित एक हजारांहून अधिक संकेतस्थळांवर बंदी घातली आहे. पण, तरीही ‘डार्क वेब’च्या माध्यमातून ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’चे पद्धतशीर रॅकेट जगभर सुरु आहे.
एका अहवालानुसार, ५० हजार ते १ लाख ‘पेडोफाईल्स’च्या माध्यमातून ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’चे हे रॅकेट जगभर चालविले जाते आणि या ‘पेडोफाईल्स’पैकी एक तृतीयांश माथेफिरु हे एकट्या अमेरिकेतच वास्तव्यास आहेत. त्यामुळे अशा विकृतांवर देशांतर्गत कारवायांबरोबरच जगभरातील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार, बालहक्क संघटनांनीही एकमुखाने कडक कारवाई करुन ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या रॅकेटला मूळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता आहे. इंटरनेटचे वैश्विक आणि क्लिष्ट स्वरुप, प्रत्येक देशातील विविध कायदे आणि तरतुदी, दिवसागणिक तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल आणि अशा गुन्हेगारांची विकृत मानसिकता ही ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ रोखण्यामागील काही प्रमुख आव्हाने म्हणता येतील. पण, केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे भविष्य असणार्या आजच्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी, ‘युनिसेफ’सारख्या जागतिक संघटनांनी या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल. नाही म्हणायला, जागतिक स्तरावर यासंबंधीची नियमावली, कायदे, करार वगैरे यापूर्वीही झाले, पण, तरीही ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या संकटाला रोखण्यात वैश्विक समुदायाला पूर्णपणे यश आलेले नाही, हे दुर्दैवी वास्तव!
जागतिक स्तरावर याबाबत जे व्हायचे, जेव्हा व्हायचे ते होईलही. पण, एक कुटुंब म्हणून, एक समाज म्हणून या विषयाकडे तितक्याच गांभीर्याने पाहण्याची जबाबदारी आपलीदेखील आहे. त्यासाठी आपल्या मुलांशी कायम सुसंवाद साधणे, त्यांना लहानपणापासूनच ‘गुड टच, बॅड टच’चे धडे देणे, आपले पाल्याचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, सोशल मीडियाचा वापर यांकडे लक्ष ठेवणे, पाल्याचा मित्रपरिवार नेमका कोण आहे, त्याबाबत दक्ष राहणे यांसारख्या बाबींचा आजच्या व्यस्त जीवनशैलीतही पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर शाळांमध्येही मूल्यशिक्षण, लैंगिक शिक्षण यांचा समावेश करणे ही देखील काळाची गरज म्हणावी लागेल. म्हणूनच ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’, मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे संतापजनक प्रकार रोखण्याची सुरुवात जगापासून नव्हे, तर प्रत्येकाने आपल्या घरातून करणे, हीच खरी कृतिशीलता!