पुण्यातील मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

    23-Sep-2024
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : पुण्यातील माण हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. सोमवारी माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा त्यांनी मंत्रालयात आढावा घेतला.
 
यावेळी ते म्हणाले की, "मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम आणि त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल."
 
हे वाचलंत का? -  आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक! राज्यभरात रास्ता रोको
 
"बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी. याकाळात वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी," असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या २६ सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.