‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. अनेक मालिका आणि चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या असल्या, तरी राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षणीय ठरली. २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ दि. १३सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्ताने अनिता दातेंशी साधलेल्या विशेष संवादात ‘तुंबाड’च्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
‘तुंबाड’मधील भूमिका रीतसर
ऑडिशन देऊनच
दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या डोक्यात १९९३ सालापासून ‘तुंबाड’ हा चित्रपट होता. इतक्या वर्षांच्या त्यांच्या मेहनतीच्या कलाकृतीचा भाग कशी झालीस, असे विचारले असता अनिता म्हणाली की, “ ‘तुंबाड’ चित्रपटाच्या ऑडिशन्स सुरु होत्या. त्यांना मराठी चेहरा असणारीच अभिनेत्री अपेक्षित होती. ज्यावेळी ऑडिशन्स सुरु होते, त्यावेळी मी ‘अय्या’ हा चित्रपट करत होते आणि योगायोगाने त्यानिमित्ताने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या कार्यालयामध्ये माझे येणे-जाणे होत होते. तिथे ‘तुंबाड’चे पोस्टर लागले होते. पण, नेमके कथानक ‘तुंबाडचे खोत’ या पुस्तकावर आधारित आहे की अजून काही आहे, हे समजत नव्हते. पण, नक्कीच काहीतरी चांगलेच कथानक असणार असे मला वाटत होते. शिवाय, मराठी चित्रपटसृष्टीत तेव्हा चर्चा सुरु होती की, राही अनिल बर्वे हा तरुण दिग्दर्शक एक नवा चित्रपट हिंदीत करतोय आणि कथानकही खूप वेगळे आहे. त्यामुळे नेमके काय असेल, या चित्रपटात याची कलाकार आणि प्रेक्षक म्हणून नक्कीच माझ्यात उत्सुकता निर्माण झाली. माझे हे विचार मनात सुरु असतानाच मला ‘तुंबाड’च्याच टीमकडून ऑडिशनसाठी बोलावण्यात आले. आणि ‘अय्या’ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत एक मराठी अभिनेत्री काम करत आहे, अशी माझी ओळख निर्माण झाली होती. कदाचित त्यामुळेच मला ‘तुंबाड’साठी बोलावण्यात आले. पण विशेष म्हणजे, त्या ऑडिशन्ससाठी सरसकट सगळ्यांना बोलावले जात नव्हते, तर काही निवडक कलाकारांनाच बोलावत होते आणि त्यात सुदैवाने मी होते. अखेर ऑडिशन चांगले झाले आणि माझी निवडही झाली. पण, त्यावेळी नेमक्या कोणत्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली आहे, हे मला ठाऊक नव्हते. काही काळानंतर आमच्या तालमी झाल्या आणि त्यानंतर मला कलाकार म्हणून विनायक यांच्या पत्नीची भूमिका जमते आहे आणि त्यात मी माझ्या अभिनयाचा आणखी कस लावून ती फुलवू शकते, असे मला वाटले आणि ती भूमिका पक्की झाली. खरे सांगायचे तर, आजवर मला ज्या मालिका, चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली, ती माझी आधीची विविध कामे पाहूनच मिळाली होती. पण, ‘तुंबाड’ हा असा चित्रपट आहे, ज्यात मला रीतसर ऑडिशनमुळे भूमिका मिळाली होती.”
दिग्दर्शकाचं ध्येय सुस्पष्ट असल्यामुळेच...
‘तुंबाड’ चित्रपट कलाकार म्हणून तुला कसा भावला, या प्रश्नावर उत्तर देताना अनिता म्हणाली, “ ‘तुंबाड’ चित्रपटाची आणखी एक कौतुकास्तपद बाब म्हणजे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी अनेक वर्षे या चित्रपटाच्या कथानकावर, स्टोरीबोर्डवर काम केले होते. विशेष म्हणजे ‘तुंबाड’ या चित्रपटाच्या निमित्ताने माझा पहिला असा अनुभव आहे की, ‘तुंबाड’चा स्टोरीबोर्ड पूर्णपणे तयार होता. त्यांनी चित्रे काढून ठेवली होती. या चित्रपटातून प्रेक्षकांना काय सांगायचे आहे आणि कलाकारांकडून कशा प्रकारच्या अभिनयाची अपेक्षा आहे, याबद्दल दिग्दर्शकांची कल्पना ही अगदी ठळक आणि सुस्पष्ट असल्यामुळे कलाकार म्हणून या चित्रपटाचा मी भाग झाले, याचा मला आनंद आहे.”
“ ‘तुंबाड’ चित्रपटाचे चित्रीकरण २०११-१२ आणि २०१४ अशा दोन टप्प्यांमध्ये झाले होते आणि अनेक वर्षे या चित्रपटाची प्रक्रिया सुरु होती आणि त्याचाच निकाल हा आता पुनःप्रदर्शित झालेल्या चित्रातून स्पष्ट होत असल्यामुळे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कष्टाचे फळ मिळाले, असे नक्कीच म्हणावसे वाटते,” असेही अनिता यांनी यावेळी बोलताना सांगितले.
...अन्यथा ‘तुंबाड’ ‘रि-रिलीज’मध्येही चालला नसता...
२०१८ साली ‘तुंबाड’ चित्रपटाला यश का मिळाले नाही, याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत अनिता म्हणते की, “मुळात ‘तुंबाड’ या चित्रपटात प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत मोठा चेहरा नव्हता, जेणेकरुन त्या नावाजलेल्या चेहर्याला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतील. कारण, आपण कोणाचा चित्रपट पाहायला जात आहोत, याविषयी प्रेक्षक फार सजग असतात. चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे खर्च करणार असू, तर त्या मोबदल्यात केवळ मनोरंजनच झाले पाहिजे, असे प्रेक्षकांना अपेक्षित असते आणि ते योग्यच. पण, ‘तुंबाड’ चित्रपटाच्या निमित्ताने सर्वच नवीन होते, दिग्दर्शकाचे नावदेखील फारसे कोणी ऐकले नव्हते किंवा कलाकारांचेही.
कदाचित याचमुळे जेव्हा पहिल्यांदा २०१८ साली ‘तुंबाड’ प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली, असे मला वाटते. दुसरे कारण चित्रपटाचे नाव ‘तुंबाड’ असल्यामुळे नेमका त्याचा अर्थ काय, हेच प्रेक्षकांना समजले नसल्यामुळेही २०१८ मध्ये अपयश आले असेल. मात्र, कालांतराने ‘तुंबाड’बद्दल चर्चा होऊ लागली आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. कोणताही नवा चित्रपट किंवा वेबसीरिज पाहिली की, प्रेक्षक जितके त्याचे तोंडी कौतुक करतात, तितकी ती कलाकृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि काही वर्षांनंतर सुदैवाने ‘तुंबाड’च्या बाबतीत तेच झाले आणि २०२४ मध्ये हा चित्रपटच पुन्हा प्रदर्शित झाल्यामुळे उशिरा का होईना, पण चित्रपटाला न्याय आणि यश मिळाले आणि आता सहा वर्षांनी हा चित्रपट चालत असल्याचे प्रमुख कारण माझ्या मते प्रेक्षकांना आता समजले आहे की, ‘तुंबाड’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पाहण्यासारखा आहे. ‘तुंबाड’ चित्रपट हा सर्वार्थाने ‘व्हिज्युअल ट्रिट’ आहे, हे प्रेक्षकांना पटल्यामुळे आता हा चित्रपट उत्तम कामगिरी करत आहे,” असे स्पष्ट मत अनिताने मांडत, हा चित्रपट पडद्यावर पाहण्यासारखाच असल्यामुळे ‘रि-रिलीज’मध्ये तो चालला, अन्यथा पुन्हा बारगळला असता,” असे म्हटले आहे.
‘तुंबाड’च्या तालमींमुळेच...
‘तुंबाड’ चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनिता म्हणाली की, “ ‘तुंबाड’ चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षक स्वतःशी जोडू शकतो. कारण, प्रत्येक पात्राला कोणत्यातरी गोष्टीची हाव आहे आणि त्यासाठीची धडपड प्रत्येक मनुष्य आजच्या काळातही करत आहे. त्यामुळे दिग्दर्शकांना माणसांचा स्वभाव या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने मांडायचा होता, तो त्यांचा उद्देश सफल झाला आणि म्हणूनच हा चित्रपटाचा भाग असणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.”
‘तुंबाड’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत अनिता म्हणाली की, “प्रत्येक दृश्याची आधी पूर्ण एक दिवस तालीम होत असे आणि त्यानंतर दुसर्या दिवशी चित्रीकरण केले जात होते. बरे एक सीन पूर्ण वेशभूषेत २०ते २५ वेळा चित्रित केला जात होता आणि त्यातील योग्य वाटणारा भाग दिग्दर्शक घेत होते. अशी बरीच मोठी प्रक्रिया ‘तुंबाड’मध्ये आम्ही केली होती. विनायक ही भूमिका साकारणारे अभिनेते सोहम शाह हे मूळ हरियाणाचे आहेत. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचा लहेजा पकडणे किंवा आपली संस्कृती समजून घेणे हा सर्व अभ्यास करायचा होता आणि खरेच कौतुकाची बाब म्हणजे, त्यांनी दिग्दर्शक राही अनिल बर्वे किंवा सेटवरील अन्य मराठी लोकांकडून मराठी भाषेचे धडे घेतले, संस्कृतीविषयी अभ्यास केला आणि ती भूमिका साकारली. ‘तुंबाड’च्या निमित्ताने भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातील कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे अहोभाग्यच समजते.”
प्रेक्षकच काय, कलाकारांनीही
मराठी दिग्दर्शकांना...
मराठी दिग्दर्शकांच्या अन्य भाषिक कलाकृतींना यश का मिळत नाही, यावर आपले मत मांडताना अनिता म्हणाली की, “मराठी दिग्दर्शकांचे हिंदी किंवा अन्य भाषिक चित्रपट पाहण्याची सुरुवात प्रेक्षकांनी आणि स्वतः कलाकारांनीदेखील केली पाहिजे. बर्याचदा आपल्याला आपले काहीच आवडत नाही. पण, इतर भाषांतील कलाकृती फार आवडतात. ज्यावेळी मराठीतील कलाकृतींना इतर भाषिक प्रेक्षक डोक्यावर घेतात, तेव्हा आपण आपल्या मातीकडे वळतो. पण, असे न करता, आधीच आपण मराठी चित्रपटांना, कलाकरांना, दिग्दर्शकांना जर प्राधान्य दिले, तर नक्कीच सगळ्यांनाच उभारी मिळेल आणि मराठी चित्रपटसृष्टी तसेच मराठीतील हिंदीत काम करणार्या सर्वच कलाकरांना आधार मिळेल आणि जोमाने काम करण्यासाठी हुरुप येईल, असे मला वाटते.”
लेखिका - रसिका शिंदे-पॉल