एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी भरत गोगावले

    21-Sep-2024
Total Views |

bharat gogawale
 
मुंबई, दि. २० : (Bharat gogawale) शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीचे आदेश शुक्रवार, दि. २० सप्टेंबर रोजी पारित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील सहभागी पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा तसेच महामंडळांवरील नियुक्त्या देण्यात येत आहेत. यामध्ये भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेच्या तीन आमदारांची नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हिंगोलीचे माजी खा. हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधनकेंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर, माजी खा. आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपदाचा दर्जा देत त्यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.