पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार

20 Sep 2024 16:48:44

quad summit 2024
 
नवी दिल्ली, दि. २० : विशेष प्रतिनिधी : (Quad summit 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान चौथ्या ‘क्वाड’ शिखर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत ‘क्वाड’ सदस्य देशांमधील गेल्या एक वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यासाठी योजना ठरवल्या जातील.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर रोजी चौथ्या ‘क्वाड’ शिखर परिषदेस सहभागी होण्यासाठी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ही बैठक विल्मिंग्टन, डेलावेयर येथे होणार असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे परिषदेचे यजमान आहेत.
 
चौथी ‘क्वाड’ शिखर परिषद ही अत्यंत महत्त्वाची असून, ज्यामध्ये सदस्य देश भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. या बैठकीत क्वाड नेत्यांकडून गेल्या वर्षभरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील योजना ठरविण्यात येणार आहेत. ही योजना हिंद - प्रशांत क्षेत्राच्या विकासासाठी विशेष महत्त्वाची ठरेल. यामध्ये सदस्य देश प्रादेशिक स्थैर्यासारख्या मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा करणार असल्याने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. युरोप आणि मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आणखी महत्त्वाची आहे.
 
याशिवाय पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी भारताची भूमिका आणि जागतिक मुद्द्यांवर भारताचा दृष्टीकोन मांडतील. या संबोधनात इतर देशांसोबत भागीदारी, जागतिक आव्हाने आणि विविध मुद्द्यांवर भारताचा दृष्टिकोन मांडला जाईल.
 
Powered By Sangraha 9.0