महिलांना २,१०० रुपये आणि २ लाख सरकारी नोकर्‍या

20 Sep 2024 13:48:15

bjp manifesto
 
नवी दिल्ली, दि. १९ : (Haryana Vidhansabha) भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा जारी केला आहे. ‘लाडली लक्ष्मी योजनें’तर्गत भाजप राज्यातील सर्व महिलांना दरमहा २ हजार, १०० रुपये देणार आहे. याशिवाय दोन लाख लोकांना रोजगार आणि हरियाणाच्या अग्निवीरांना सरकारी नोकर्‍यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत हरियाणा भाजपने जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी हरियाणाची परिस्थिती चांगली नव्हती. जमिनी बळकावणे, जमिनीचा वापर बदलणे, शेतकर्‍यांच्या जमिनी काढून घेणे, हे सर्व दहा वर्षांपूर्वी हरियाणात होत असे. काँग्रेसचे सरकार असताना १ हजार, १५८ रुपये पीक अनुदान दिले जात होते. मात्र, भाजप सरकारमध्ये शेतकर्‍यांना १२ हजार कोटींहून अधिक अनुदान देण्यात आले आहे. यापूर्वी शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानीसाठी एकरी सहा हजार रुपये भरपाई दिली जात होती. मात्र, आता त्यांना एकरी १५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते,” असे नड्डा यांनी नमूद केले.
 
असा आहे भाजपचा जाहीरनामा
 
⦁ ‘लाडली लक्ष्मी योजने’अंतर्गत सर्व महिलांना दरमहा २ हजार, १०० रुपये देणार.
 
⦁ आयएमटी खरखोदाच्या धर्तीवर दहा औद्योगिक शहरांची निर्मिती.
 
⦁ स्थानिक तरुणांना नोकर्‍या देण्यासाठी उद्योजकांना विशेष प्रोत्साहन.
 
⦁ ‘चिरायु-आयुष्मान योजनें’तर्गत प्रत्येक कुटुंबाला दहा लाखांपर्यंत मोफत उपचार.
 
⦁ कुटुंबातील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक ज्येष्ठासाठी पाच लाखांपर्यंतची स्वतंत्र मोफत उपचार सुविधा.
 
⦁ घोषित किमान आधारभूत किमतीवर २४ पिकांची खरेदी.
 
⦁ शहरी आणि ग्रामीण भागात पाच लाख घरे.
 
⦁ पाच लाख तरुणांसाठी रोजगाराच्या इतर संधी आणि ‘राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती योजने’तून मासिक स्टायपेंड.
 
⦁ सरकारी रुग्णालयामध्ये डायलिसिस आणि सर्व रुग्णालयांमध्ये निदान मोफत.
 
⦁ प्रत्येक हरियाणच्या अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी.
 
⦁ केएमपीच्या ऑर्बिटल रेल्वे कॉरिडॉरचे बांधकाम आणि भारत सरकारच्या सहकार्याने नवीन वंदे भारत रेल्वे.
 
⦁ भारत सरकारच्या सहकार्याने फरिदाबाद आणि गुरुग्राम दरम्यान विविध जलद रेल्वे सेवा आणि इंटरसिटी एक्सप्रेस मेट्रो सेवा सुरू करणे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0