वक्फ घोटाळाप्रकरणी अमानतुल्लाह खान यांना अटक, ईडीची कारवाई

    02-Sep-2024
Total Views |
waqf scam amantullah khan ed action


नवी दिल्ली :   आम आदमी पक्षाचे नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वक्फ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. ईडीने सकाळीच आप आमदार अमानतुल्लाह खान यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. यावेळी चार तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी खान यास अटक केली. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार खान यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना तपास करू देण्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले होते.


आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डात ३२ जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. त्यांनी निधीचा गैरवापर केला. याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून दिल्ली पोलिसांकडे तीन तक्रारीही दाखल केल्या आहेत. ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे.

दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओंनी अशा बेकायदेशीर भरतीविरोधात निवेदन जारी केले होते. तपासादरम्यान अमानतुल्लाच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांहून रोख रक्कम जप्त करण्यात आली. या संदर्भात अमानतुल्ला यांची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. यासोबतच वक्फ बोर्डाच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाने ही अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.