जम्मू : जम्मूतील भारतीय सैन्याच्या सुंजवान या लष्करी छावणीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात भारतीय सैन्याचा एक जवान गंभीर जखमी झाला. सुदैवाने यात अन्य कुठलीही जीवीत हानी झालेली नाही. सुंजवान हे जम्मू मधील भारतीय लष्कराचे सर्वात मोठे तळ असून, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भागात शोधमोहीम सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या कुंपवाडा जिल्हयात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दोन आठवड्यांपासून दहशतवाद्यांमार्फत सातत्याने जम्मू खोऱ्यात अशांतता पसरवण्याचे काम सुरू आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ऑक्टोबर अशा तीन टप्पयांमधे होणार आहेत. निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांनी अशांततेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.