इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आणखी एका युनिटला मंजुरी
02-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. देशात सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला मान्यता देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या युनिटमध्ये ३,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या युनिटची क्षमता प्रतिदिन ६० लाख चिप्स इतकी असेल. त्याचबरोबर, युनिटमध्ये उत्पादित चिप्स औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहने, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाइल फोन इत्यादीसारख्या विभागांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या ऍप्लिकेशन्सची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणार आहे.
देशातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी एकूण ७६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सर्व ४ सेमीकंडक्टर युनिट्सचे बांधकाम वेगाने सुरू असून युनिट्सजवळ सक्षम सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण होत आहे. या ४ युनिट्समध्ये जवळपास १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून युनिट्सची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे ७ कोटी चिप्स इतकी आहे.
विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये आणखी तीन सेमीकंडक्टर युनिट्स मंजूर करण्यात आले आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्स गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब आणि आसाम मधील मोरीगाव येथे एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करत आहे. सीजी पॉवर गुजरातमधील साणंद येथे एक सेमीकंडक्टर युनिट उभारत आहे.