'गो' म्हणजे गाय व ‘घृत’ म्हणजे तूप. थोडक्यात ‘गोघृत’ म्हणजे गायीचे तूप. गायीला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिला ‘गोमाता’ म्हणूनही पूजले जाते. गायीपासून मिळणारे पदार्थ म्हणजे सर्वात प्रथम दूध. प्राचीन काळापासून आपल्याकडे मुख्यतः गायीचेच दूध प्यायले जात होते. परंतु, इंग्रजांच्या काळात म्हशीच्या दुधाचा सर्रास वापर होऊ लागला. म्हशीच्या दुधात स्निग्धांश अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. हल्ली हृदयरोगाचे प्रमाण वाढण्यास ते एक कारण आहे. गायीच्या दुधात स्निग्धांश (fat) कमी प्रमाणात असल्यामुळे ते सर्व प्रकारच्या दुधात सर्वश्रेष्ठ आहे.
दुधापासून तूप दोनप्रकारे मिळवले जाते. 1) दूध घुसळून (क्षीरोद्भव) क्षीरोद्भव तूप हे जुलाब (loose motion) होत असतील तर उपयोगी येते. 2) प्रथम दूध उकळवतात. थंड झाल्यावर त्यावरची साय काढून घेऊन त्यावर दह्याचे विरजण लावतात. दुसर्या दिवशी रवीने (blender) घुसळून ताक आणि लोणी वेगवेगळे करतात. लोणी कढवत (उकळवत) ठेवायचे. फेस येणे बंद झाल्यावर तूप मिळते. म्हणजेच एका दुधावर किती प्रकारचे संस्कार होतात, तेव्हा तूप मिळते. दूध उकळविणे (अग्निसंस्कार) सायीचे दही करणे (bacteria formation), मंथन (blender), पुन्हा तापवणे (अग्निसंस्कार). अर्थात तूप बनवताना त्यावर जरी अग्निसंस्कार होत असला, तरीही तूप हे शीत गुणाचे आहे. म्हणूनच ते शरीरातील वाढलेल्या वात आणि पित्ताला शांत करते.
2) तूपाचा दुसरा गुण स्निग्ध. सर्व स्निग्ध पदार्थांमध्ये (तेल, तूप, वसा, मज्जा) तूप श्रेष्ठ आहे. पाश्चात्यांचे अंधानुकरण केल्यामुळे आपण तूप खाणे सोडून दिले. पण, त्यामुळेच शरीरातील स्निग्धपणा कमी होत चालला आहे. एखादे कुरकरणारे दार किंवा गाडीलाही ऑईलिंग करावेच लागते. वंगण घालावे लागते. स्निग्धपणा कमी झाला की कोरडेपणा वाढतो. थोडक्यात, वात दोष वाढतो. मग आपले शरीरदेखील कुरकुर करू लागते. स्निग्ध गुणाच्या (जोडण्याच्या) अभावानेच आपापसातील नातेसंबंधही दुरावत चालले आहेत.
3) तूप हे विषघ्न आहे. म्हणून तुपाला बोलीभाषेत ‘आनशुद’ म्हणतात. ‘आन’ म्हणजे अन्न. ‘शुद’ हा शुद्ध शब्दाचा अपभ्रंश. म्हणून तर आपल्याकडे जेवण वाढून झाल्यावर शेवटी त्या अन्नावर तूप वाढायची पद्धत आहे. किती शास्त्रोक्त आहे ना!
गोघृताचे फायदे -
1) धी (intellect) म्हणजे बुद्धी
2) स्मृती (memory) स्मरणशक्ती
3) मेधा (cleverness) वाढवणारे आहे. धी, स्मृती सांगून नंतर ‘मेधा’ असा उल्लेख केला आहे. ‘मेधा’ म्हणजे युक्तिपूर्वक मानवजातीच्या हिताकडे घेऊन जाणारे चातुर्य ज्ञान.
4) जठराग्नी (digestive strength) भूक वाढवणारे आहे.
5) बल (strength) शरीराची ताकद वाढवणारे.
6) आयुष्यवर्धक (longitivity) दीर्घायुष्य देणारे.
7) डोळ्यांसाठी हितकर
8) शुक्र (virality) धातू वाढवणारे.
9) लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर आहे.
10) ज्यांना आपली कांती (complexion), सुकुमारता (tenderness) वाढवायची आहे त्यांच्यासाठी.
11) स्वरतंतू (vocal cord)ची ताकद वाढवण्यासाठी.
तूप हे वेगवेगळया औषधांनी तयार केल्यास अनेक आजारांवर वापरता येते.
पुराणघृत (जुने तूप) फायदे - तुपात असंख्य गुण असले, तरी त्याचा वास हा एक दोष आहे.त्यामुळे काही औषध घालून ते उकळवतात. थंड झाल्यावर मातीच्या मडक्यात मात कापड करून (air tight)जमिनीखाली पुरून ठेवतात. शिवाजी महाराजांच्या काळात तुपाच्या विहिरी असल्याचे आपण ऐकलेच आहे. असे जुने तूप कोणत्याही जखमेवर लावले असता, तेथे infection अजिबात होत नाही आणि जखमही लवकर भरून येते. तसेच ते फेफरे (epilepsy), मूर्च्छा (fainting), कान, डोळे, डोकेदुखीवर उपयुक्त ठरते.स्त्रीरोगात (gynecological disorder) फायदा होतो. बाजारात शतधौतघृत (100 वेळेला धुतलेले) मिळते. तेही कोणत्याही जखमेवर लावल्यास तेवढाच फायदा होतो.
परीक्षा - शुद्ध तूप आपल्या मळहातावर (उलटा तळहात) लावल्यावर ते लगेच विरघळू लागते, ते हातातल्या उष्णतेमुळेच. मग पोटात तर अधिक उष्णता असते. कोणताही यज्ञ करताना अग्नी प्रज्वलित करण्यासाठी तूपच वापरतात. मग आपल्या पोटातील अग्नी जर योग्य ठेवायचा असेल, तर तिथेही तूप हवं ना? कारण, आयुर्वेदात तर म्हटले आहे की, ‘रोगाः सर्वे अपि जायन्ते मन्दे अग्नौ!’ पोटातला अग्नी कमी झाल्यामुळेच सर्व प्रकारचे रोग होतात. म्हणूनच दिवसाला (दोन ते तीन चमचे) भातावर किंवा पोळीला तूप लावून खाऊया आणि जठराग्नी योग्य ठेवून स्वस्थ राहूया.
- डॉ. आश्लेषा रानडे, साहाय्यक प्राध्यापक, अपोलो कॉलेज ऑफ वेटेरिनरी मेडिसिन,
- डॉ. ऋता सुधीर रानडे, आयुर्वेद वाचस्पती