जाणीव महासागराची, सृष्टीच्या भवितव्याची !; रत्नागिरी सागर महोत्सव
02-Sep-2024
Total Views |
रत्नागिरीत दरवर्षी सागर महोत्सवाच्या निमित्ताने समुद्रप्रेमींचा मेळा भरतो. या मेळ्यात समुद्राविषयी, त्यातील जैवविविधतेविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयीच्या माहितीची देवाणघेवाण होते. यावर्षी देखील हा मेळा भरणार आहे जानेवारीत, जाणून घेऊया त्याविषयी (ratnagiri sagar mahotsav)...
आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन’ आपली पृथ्वी राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्याच्या एकमेव उद्देशाने मुलं, शास्त्रीय संगीत, निसर्ग आणि पर्यावरण यामध्ये एकरूपता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या तिन्ही गोष्टी निर्मात्याची रूपं नसून निर्माताच आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास, शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार याबरोबरच निसर्ग आणि पर्यावरण यामध्ये संस्था मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहे.
रत्नागिरीमध्ये ‘आसमंत’ने विकसित केलेली शहरी जंगले हे पक्ष्यांच्या जवळजवळ ५० प्रजाती, २० फुलपाखरांच्या प्रजाती तसेच खूप मोठ्या संख्येने कीटक, सरडे, घोरपडी व अन्य सरपटणार्या प्राण्यांसाठीचे घर बनले आहे. हे कार्य संयुक्त राष्ट्र परिषदेने निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी शाश्वत विकास उद्दिष्ट क्र. ४, १५ आणि १६ शी संलग्न आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेने शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ उद्दिष्टांपैकी शाश्वत विकास ध्येय क्र. १४ हे ‘शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचे संरक्षण आणि शाश्वत वापर करणे’ आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी आणि पृथ्वीवरील जीवनासाठी निरोगी महासागर आणि समुद्र आवश्यक आहेत. याच ध्येयाला अनुसरून ‘आसमंत’ गेली दोन वर्षे ‘सागर महोत्सवा’चे आयोजन करत आहे.
सागर हा विश्वाचा दाता आहे. कोट्यावधी लोक आपल्या जीविकेसाठी सागरावर या ना त्या कारणाने अवलंबून आहेत. सागराकडून आपल्याला मीठ, मासे आणि इतर उत्पादने मिळतात. याशिवाय लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, जस्त इत्यादी खनिजेही मिळतात. सागर दळणवळणाचे साधन आहे. अशा दात्याचा अभ्यास करणारे, त्यातून विविध उत्पादने मिळवून उदरनिर्वाह, पैसे कमावणारे बरेच आहेत. पण, त्याचा यथोचित सन्मान करून त्याचा महोत्सव करणार्यांमध्ये ‘आसमंत’ ही संस्था आहे. कदाचित, असा सागर महोत्सव भारतात एकमेवच असावा. ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थे’च्या संचालकांनी असा कार्यक्रम आम्हाला का सुचला नाही, असे उद्गार काढले, यातच या महोत्सवाचे श्रेय सामावले आहे.
दोन वर्षे अनेक मान्यवर अभ्यासकांची व्याख्याने, सागराचे वैविध्य आणि अभ्यासात्मक दृक्श्राव्य फिती, पुळणी समुद्र अभ्यासफेर्या, खडकाळ समुद्र अभ्यासफेर्या, खारफुटीच्या जंगलांच्या अभ्यासफेर्या असा सर्वसमावेशक ‘सागर महोत्सव’ साजरा झाला. येत्या जानेवारीमध्ये होणार्या सागर महोत्सवामध्ये या सगळ्याबरोबरच काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा ‘आसमंत’चा मानस आहे. एक महासागर, एक भविष्य या दृष्टिकोनातून पुढे जायचे आहे. जगातील महासागरांच्या परस्पर संबंधांवर, त्यांचे आरोग्य आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. त्यात ‘आसमंत’ला आपल्या खारीच्या वाट्याने योगदान द्यायचे आहे. जागतिक स्तरावरील हा विषय ‘आसमंत’हे ‘विश्वचिये माझे घर’ या विचाराने, आपले काहीतरी योगदान असावे म्हणून प्रयत्न करणार आहे. समुद्रमंथनातून १४ रत्ने प्राप्त झालीच आहेत, कोण जाणे या प्रयत्नातून पंधरावे प्राप्त व्हायचे! भौगोलिक विभागणी असूनही, महासागर सतत एक, परस्पर जोडलेला भाग आहे; जो जागतिक हवामान नियमन, अन्न सुरक्षा आणि आर्थिक विकासास समर्थन देतो. त्याच्याकडून फक्त घेत राहिलो तर सागरसंपत्तीचा र्हास होईल, त्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. अतिमासेमारी, प्रदूषण इत्यादी समस्यांमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी फायदे आणि संसाधने प्रदान करण्याची सागराची क्षमता धोक्यात येऊ नये म्हणून उपाय करण्याची नितांत गरज आहे.
एक महासागर, एक भविष्य या विचारात सागरी संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, व्यवस्थापनासाठी संशोधन आणि माहितीचा उपयोग, निरोगी महासागरासाठी काही लक्ष्ङ्म ठरवून, प्रदूषण कमी करणे आणि शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देणे अशा गोष्टींचा समावेश आहे. परंतु, सर्वसामान्यांसाठी एक महासागर, एक भविष्य यात महासागराची अथांगता, कल्पनेपलीकडील अद्भुत विश्व, हे आपले आहे - हे जपायला हवं, सागराचे आध्यात्मिक महत्व, एक महाशक्ती या जाणिवांचा अंतर्भाव दिसतो. ‘आसमंत’ या दोन्हींमधला दुवा असण्यात आनंद मानत आहे. ‘आसमंत’नी हा विचार आज केलेला नाही. गेल्या वर्षी आसमंतच्या तरुण मित्राने रत्नागिरी ते कारवार सायकलवारीवर आसमंतचा ‘जपश जलशरप’ हाच संदेश प्रदर्शित केला होता. फक्त ‘आसमंत’चे प्रयत्न यासाठी अपुरे आहेत, हे आम्ही जाणतो. सागरापासून लांब राहणार्या लोकांसाठीही सागराची जपणूक किती महत्वाची हे अधोरेखित करण्याचा हा छोटासा प्रयत्न. ‘आसमंत’बरोबर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोंनोग्राफी’, ‘कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन’, ’किर्लोस्कर वसुंधरा’ ‘मुंबई तरुण भारत’, वगैरे बर्याच नामवंत संस्था जोडल्या गेल्या आहेत. पण, या उपक्रमाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी अजून कितीतरी काम करावे लागेल आणि त्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि पाठिंब्याची गरज लागेल. ‘आसमंत’च्या सागराप्रति जिव्हाळ्याच्या या कार्यक्रमाला पाठिंब्याची, मार्गदर्शनाची गरज आहे. सर्वांनी यात सामील होऊन ‘आसमंत’चा सागर महोत्सव राष्ट्रीय दर्जाचा करूया.
- नंदकुमार पटवर्धन
(लेखक ‘आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन’चे संस्थापक संचालक आहेत.)