मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (UP Gohatya News) उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील इब्राहिमपूर पोलिसांनी गोहत्येच्या आरोपाखाली शनिवारी (३१ ऑगस्ट) मुस्लिम समाजातील दोन आरोपींना अटक केली आहे. दिलशाद बेग आणि अरबाज अशी गोहत्या करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याकडून ३२ किलोहून अधिक गोमांस जप्त करण्यात आले आहे. यांपैकी फरार असलेल्या गुडनू नामक आरोपीचा सध्या तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खबरीकडून माहिती मिळाली की, ४ जण २ दुचाकीवरून गोमांस घेऊन जात आहेत. यावेळी त्यांच्याकडे बेकायदा शस्त्रे असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. समोरून दुचाकीवरून येणाऱ्या चौघांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी चौघांनाही आत्मसमर्पण करण्यास वारंवार सांगितले परंतु त्यांनी गोळ्या झाडणे सुरूच ठेवले.
या चकमकीत दोन आरोपी फरार झाले असून दिलशाद आणि अरबाज यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३२ किलो गोमांस, एक बंदूक, काडतुसे, लोखंडी चापड, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी दिलशाद आणि अरबाजला अटक करून कोर्टात पाठवले असून फरार सलमान आणि गुडनूच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत. या सर्वांविरुद्ध गोहत्या कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यासह भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.