वीरू, अब गब्बर रिटायर होने को हैं...

    02-Sep-2024
Total Views |

retired sports players 2024
काही खेळाडू त्यांच्या खेळाने क्रीडारसिकांना असे मोहित करतात की, त्यांची कारकीर्द संपूच नये असे वाटते. तर काही खेळाडू क्रीडाविश्वात उगवतात आणि निवृत्तही होतात. गेल्या काही दिवसांत असेच अनेक भारतीय खेळाडू निवृत्त झाले. या प्रत्येकानाचे भारतीय क्रीडारसिकांचे मनोरजंन केले. त्या खेळाडूंच्या निवृत्तीचा घेतलेला हा आढावा...

गुरुवार, २९ ऑगस्टला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा ११९ वा जन्मदिन, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून समस्त क्रीडाप्रेमींनी त्यांना मानवंदना देत साजरा केला. त्यानंतर, आपण सगळे पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारतीय दिव्यांग क्रीडापटूंच्या कामगिरीचे कौतुक करण्यात गर्क आहोत. सप्टेंबरच्या 8 तारखेपर्यंत आपल्याला त्यांचे पूर्ण लोभसवाणं चित्र स्पष्ट होईल की, मग आपण त्याचा एकत्रित आढावा घेत त्यांचे कौतुक करूच. तत्पूर्वी त्याच पॅरिसमध्ये आपले खेळाडू, ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन ऑगस्टमध्ये परतले आहेत. ते परतत असताना त्यातील काही क्रीडापटूंनी आपली क्रीडानिवृत्ती घोषित केली आहे, त्यातील काहींनी आपल्यानंतरची पिढी आपल्यापेक्षाही सरस निघावी म्हणून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडाक्षेत्रातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. गब्बर, आयर्न मॅन, होमगार्ड, अर्थशास्त्री अशा नावांनी ओळखल्या जाणार्‍या काही मोजक्यांनी निवृत्ती घोषित केली आहे. कोण आहेत ते! याची उकल आपण या लेखात करून घेत आहोत.
 
धीरोदात्त गब्बर...
 
ऑगस्ट १५ ला ४९वा वाढदिवस साजरा करणार्‍या ‘शोले’ चित्रपटातला गब्बर आपल्याला आठवत असेल. तसे खलनायकी नव्हे तर, खरे नायक असलेले अजून दोन गब्बर लोकप्रिय झालेले मला आठवतात. त्यातील एक गब्बर नोव्हेंबर २०२२ला जगप्रसिद्ध झाला होता. उत्तरकाशीमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना, दरड कोसळून त्यात मजूर अडकले होते. त्या अडकलेल्या लोकांमध्येही नेगी आडनावाचे एक गब्बर सिंह होते. ‘शोले’चा तो गब्बर लोकांचा थरकाप उडवत होता, तर हा गब्बर सर्वांना धीर देत मनोधैर्य टिकवून ठेवत सगळ्यात शेवटी बाहेर निघाला आणि लाडका झाला होता.
 
वीरूचा वारसदार गब्बर !
 
’शोले’तील गब्बरच्या संवादापाठोपाठ मला अजून एका गब्बरचे संवाद आठवतात ते असे, ”यापुढे देशासाठी पुन्हा खेळायला मिळणार नाही, याचे दुःख करण्यापेक्षा, मी देशासाठी खेळलोय, याचा फार मोठा आनंद आहे, असे मी स्वतःलाच सांगत आहे.” आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना, या गब्बर ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या शिखर धवनने 24 ऑगस्ट २०२४च्या शनिवारी तसे घोषित केले. ”असं म्हणतात ना, आयुष्याच्या गोष्टीत पुढे सरकायचं असेल तर पुस्तकाची पानं उलटावी लागतात. तसंच काहीसं मी करायला जातोय. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून मी माझ्या निवृत्तीची घोषणा करतोय. मी माझ्या निवृत्तीची घोषणा करताना मनात समाधान आहे की, मी माझ्या देशासाठी चांगलं खेळलो. मी बीसीसीआयचा खूप आभारी आहे, ज्यांनी मला खेळण्यासाठी संधी दिली,” असं शिखरने म्हटल आहे.
 
शिखर धवनला ‘गब्बर’ का म्हणतात, याचा खुलासा खुद्द शिखरने एका क्रीडा नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना ‘सिली पॉईंट’वर उभा होतो. त्यावेळी विरोधी संघातील खेळाडूंच्या मोठ्या भागीदारीने आमचे सर्व खेळाडू निराश होते. अशा परिस्थितीत मी जोरात ओरडलो, ‘बहुत याराना है सुअर के बच्चो’, यानंतर सर्व खेळाडू जोरजोरात हसू लागले. तिथून माझे नाव गब्बर ठेवले. हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की जगभरातील क्रिकेट चाहते आताही मला गब्बर म्हणतात.
 
गब्बर हा वीरूचा वारसा :
 
गब्बर हा वीरुचा वारसा! होय वीरु हे टोपणनाव असलेल्या वीरेंद्र सेहवागचा वारसदार म्हणून, आणि त्याच्या जागेवर संधी मिळवतच शिखर धवनने दिमाखदार कसोटीत पदार्पण केलं होतं. डावखुरा खेळणाऱा शिखर आज निवृत्त होत आहे. क्रिकेटच्या तीनही प्रारुपातून निवृत्ती घेणारा शिखर हा आज ३८ वर्षांचा खेळाड होता. वयापरत्वे त्याचे आधीचे कसब दाखवण्यात तो कमी पडू लागला असावा. कदाचित, म्हणूनही भारतीय संघात आज तो निवडला जात नव्हता, तसेच दिलीप ट्रॉफी संघ निवडीतूनही त्याला वगळण्यात येत होते. हे जाणून घेत त्याने समंजसपणाने निवृत्तीचा योग्य निर्णय घेतला आहे, हे त्याने उत्तमच केलं आहे. तर अशा ह्या ‘गब्बर’चा रामराम क्रिकेटजगत स्वीकारत आहे आणि त्याच्या भावी काळासाठी त्याला शुभेच्छा देत आहे.
 
आयर्न मॅन
 
शिखरच्या आधी वयाचा विचार करत निवृत्त होणारा रोहन बोपण्णाला आठवा. भारतीय टेनिसचा ’आयर्न मॅन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोहन बोपण्णाने टेनिसला ३० जुलै २०२४ रोजी अलविदा केला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत बाहेर पडल्यानंतर, त्याने एटीपी सर्किटसारखे व्यावसायिक सामनेवगळता आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. तीन ऑलिम्पिक खेळलेल्या ४४ वर्षीय बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिकआधी शेवटी २०२३ च्या ’हांगझोऊ आशियाई स्पर्धेत’ भारताकडून खेळताना त्यात, मिश्र युगल जोडीत ऋतुजा संपतराव भोसले हिच्यासमवेत खेळून सुवर्णपदक पटकावलं होतं. बोपण्णाने आपला ऑलिम्पिक मधला प्रथम प्रवेश लंडन २०१२ मध्ये केला होता, ज्यात पुरुष युगल जोडीत महेश भूपतीसमवेत खेळत दुसर्‍या फेरीत त्याने प्रवेश मिळवला होता.
 
ऑलिम्पिकमध्ये आपण स्वतःपेक्षा देशाला प्राधान्य देत प्रतिनिधित्व करत असतो, पण एटीपीसारख्या स्पर्धांत स्वतःसाठी बोपण्णासारखे व्यावसायिक टेनिसपटू खेळत राहतात. व्यावसायिक पातळीवर कमालीच्या निग्रहाने खेळताना, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आज ’यू. एस. ओपन’मध्येही तो आता उतरला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येणारा बोपण्णा हा पहिला टेनिसपटू ‘आयर्न मॅन’ ठरत आहे. तर, अशा ‘आयर्न मॅन’ बोपण्णाला आपण सारे टेनिसप्रेमी त्याच्या भावी काळासाठी शुभेच्छा देऊ.
 
द होम गार्ड :
 
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक भारताला मिळवून देण्यात ज्याची मोलाची कामगिरी ठरली होती, तो पी. आर. श्रीजेश या गोलरक्षकाने आपली १६ क्रमांकधारी जर्सी आता धुऊन इस्त्री करुन, हँगरच्या स्वाधीन केली आहे. भारतीय हॉकी संघटनेनेदेखील भारतीय वरिष्ठ हॉकी संघातील यापुढील कोणत्याही खेळाडूला, तो जर्सी क्रमांक मिळणार नसल्याचे सांगत, त्याद्वारे श्रीजेशचा एका अर्थाने सन्मान केला आहे.
 
केरळच्या किझाक्कंबलम गावात शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्रीजेशने, वयाच्या 12व्या वर्षी हॉकी खेळायला सुरुवात केल्यानंतर, अनेक सामने खेळत ऑलिम्पिकमध्ये भरत छेत्रीचा राखीव गोलरक्षक म्हणून 2012च्या लंडन ऑलिम्पिकपर्यंत खेळला. नंतर मात्र तो प्रमुख गोलरक्षक झाला. ते स्थान त्याच्याकडून काढावे, असे कोणत्याही निवड समितीच्या सदस्यांच्या मनाला तसूभरही वाटले नव्हते. थांबायचे कुठे हे ठरवण्याची परिपक्वता असलेल्या श्रीजेशने, स्वतःच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.८ ते १२ सप्टेंबर २०२४ दरम्यान चीनमध्ये आशियाई चँपियन्स हॉकी करंडक स्पर्धा होत आहेत. त्यात पाठक मुख्य गोलरक्षक असेल तर, सुरज करकेरा हा राखीव असेल असं नुकतेच घोषित करण्यात आलं आहे. आता बघू तो २९ वर्षांचा सुरज करकेरा आणि २७ वर्षांचा कृष्णन बहादूर पाठक याांचा रंग श्री-रंगासारखाच असेल काय!
 
पी. आर श्रीजेशच्या निवृत्तीच्यावेळी अजून एका नेगीची आठवण येते. मीर रंजन नेगी हा भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघाचा माजी गोलरक्षक. चक दे इंडिया चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. १९८२च्या आशियाई स्पर्धेत नेगी हा, पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही भारताच्या संघाचा गोलरक्षक होता.मेजर ध्यानचंद यांच्या काळापासून पॅरिस 2024च्या भारतीय संघात गोलरक्षण करताना भारतीयांनी अनेक बरे, वाईट, उत्तम असे हॉकी गोलरक्षक अनुभवले. पण या सम हाच, असा असणारा श्रीजेश गोलातून सगळ्या खेळाडूंना ओरडत सल्ला देत असे. विश्रांती घ्यायची जेव्हा वेळ असते, तेव्हा श्रीजेश विविध प्रकारचं वाचन करतो. असा संघाचा लाडका होम गार्ड वैयक्तिक जीवनातही घरच्यांसाठी तत्पर होम गार्ड आहे. श्रीजेश हा कुटुंबवत्सलही आहे. आपल्या मुलाला व मुलीला स्वतः मोटारसायकलने शाळेत सोडणे, शाळेतून आणणे, ही कर्तव्ये तो मनापासून करत आला आहे. श्रीजेश नेहमी तीन हॉकी स्टीक वापरत असे, त्याने त्यापैकी एकाला ’श्रीयंश’ हे त्याच्या मुलाचे, तर दुसर्‍या स्टीकला ’अनुश्री’ हे त्याच्या मुलीचे नाव दिलेले आहे. तिसर्‍या स्टीकला त्याने त्याच्या पत्नीचे ’अनीष्या’ हे नाव ठेवलं असून, ते लिहिताना त्याने त्याच्या पत्नीचा लाडका रंग वापरला आहे. ती बायकोची स्टीक तो नेहमी, पेनल्टी शूट आऊटच्या वेळेत वापरत असे. म्हणूनच, कदाचित तो कुटुंबाच्या सहकार्याने एवढा यशस्वी झाला. मुलांवर संस्कार करत जीव लावणारा श्रीजेश, त्याला आता भारतीय हॉकी संघटनेने कनिष्ठ संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देऊ केली आहे. त्यानहीे ती स्वीकारली आहे. पाहू आता कनिष्ठ गटातील कोणी श्रीजेश होत भारताचा होम गार्ड होतोय का !
 
क्रीडापटू अर्थशास्त्री
 
भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेबलटेनिस क्रीडाप्रकारात खेळणारी बंगरुळूची अर्चना गिरीश कामत, हिनेही निवृतीची घोषणा केली आणि सगळे क्रीडाप्रेमी बुचकळ्यात पडले. आयहिका मुखर्जीला डावलून भारतीय संघात जीची निवड झाली होती तीच ही अर्चना, पॅरिसमध्ये बरी कामगिरी करत आता क्षेत्रच बदलत आहे. आई-वडील दोघेही नेत्ररोगतज्ञ, तर ’नासा’त कार्यरत. अर्चनाच्या घरची अशी शैक्षणिक पार्श्वभूमी बघता, तिला देखीलजास्तीतजास्त वेळ अभ्यासाला द्यावा, असे वाटणं हे स्वाभाविकच आहे. विश्वविद्यालयात अर्थशास्त्रात शिक्षण घेऊन, पुढे मग तिने आंतरराष्ट्रीय संबंध, रणनीती आणि सिक्युरिटीजमधील पदव्युत्तर पदवीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता पूर्ण करून, तिचा अभ्यास सुरू ठेवला. त्याचवेळी भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. त्यामुळे अर्चनाने तेवढ्यापुरते खेळाला प्राधान्य दिले. मात्र, आता ऑलिम्पिक संपल्याने तिने अधिक शिक्षण घ्यायचे आणि दोन वर्षांनी मायदेशी परत येत देशवासीयांची क्रीडेव्यतिरिक्त वेगळ्या भूमिकेत सेवा करायचं ठरवलं आहे. देशाच्या दृष्टिकोनातून विचार करता अर्चनाचे वागणे समर्थनीय खचितच नाही. भारत सरकारच्या टॉप्स आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टकडून आर्थिक व अन्य पाठिंबा मिळूनही, डाव अर्ध्यावर सोडून जाण्यासारखे आहे. अर्चनाने पुढच्या ऑलिम्पिक प्रवेशाची तयारी आत्तापासूनच चालू करायला हवी होती.
 
अर्चनाचे प्रशिक्षक अन्सुल गर्ग हेदेखील तिच्या कृतीने आश्चर्यचकित झाले असावेत, असं त्यांच्या एका वार्तालापातून आढळते. असं जरी असलं तरी आपण आता तिने ठरवलं आहे त्यासाठी तिच्या भावी जीवनालाही आपण क्रीडाप्रेमी शुभेच्छा देऊ. या लेखाचा समारोप करताना आपण निवृत्तीच्या संदर्भातील एक उदाहरण बघू, आणि नंतर हा लेख थांबवू. खेळातून निवृत्ती जाहीर केली म्हणजे, त्या क्रीडाप्रकाराच्या कोणत्याच स्पर्धेत सहभाग घेणे थांबवायचे असे नसते. आत्ता आपण रोहन बोपण्णाचं उदाहरण पाहिले, तसाच प्रकार आता शिखर धवनच्या बाबतीत आपल्याला दिसेल. सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जरी शेवटचा सलाम केला असला तरी, सप्टेंबरमध्येच होत असलेल्या ’लेजेंड्स लीग क्रिकेट’मध्ये तो खेळणार असून, इतर टी-ट्वेंटी लीगमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे.
 
तसं म्हटलं तर एखाद्याने निवृत्ती जाहीर केली, यातील निवृत्ती या शब्दावरून, निवृत्तीचे अनेकविध प्रकार आपल्याला आढळतील, त्यातील क्रीडानिवृत्तीचेही उपप्रकार आहेत, त्यातील केवळ तीन प्रकार आपण बघितले. जसे की शिखर धवनची आणि रोहन बोपण्णाची निवृत्ती, श्रीजेशची निवृत्ती आणि अर्चना कामतची निवृत्ती. तर, आपण तूर्तास या लेखाला सायोनारा करत पुन्हा एकदा नवीन विषयासह नक्की भेटू.
इति!
 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
लेखक - श्रीपाद पेंडसे