"उद्धव ठाकरे कधीच...;" खासदार नारायण राणेंची टीका

    02-Sep-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray & Narayan Rane
 
मुंबई : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, अशी टीका खादसार नारायण राणेंनी केली आहे. मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
 
नारायण राणे म्हणाले की, "अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त दोनवेळा मंत्रालयात आलेत. असा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तुम्हाला वैचारिकता नाही, कुठल्याही प्रशासनाचं ज्ञान नाही, कायदा कसा हाताळतात याचं एक टक्काही ज्ञान नाही. त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं. पण ही उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या हिताची नाही."
 
हे वाचलंत का? -  शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद! खासदार नारायण राणेंचा घणाघात
 
"मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात एक वातावरण तयार झालं आहे. महाराजांचा पुतळा पडणे हा एक दुर्दैवी अपघात होता. त्यांचा अपमान करण्याची हिंमत या देशात कुणाचीही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी श्रद्धास्थान आहे. या विषयावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. काँग्रेसचे त्यावेळीचे पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर २७ ऑगस्ट २००४ रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसविरोधात जोडेमारो आंदोलन केले होते. मीसुद्धा त्यात सहभागी झालो होतो. आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या हातात हात घालून हिंदुत्वविरोधात आंदोलन करत आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "राहूल गांधींनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिणवलं. त्यावेळी उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प राहिलेत. उद्धव ठाकरेंमध्ये अस्मिता शिल्लक आहे का? महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अस्मिता शिल्लक आहे का?" असा सवाल नारायण राणेंनी केला आहे.
 
"सामना वृत्तपत्रातील भाषा ही मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे की, नवीन मराठी शिकणाऱ्यांना ही भाषा शिकू नये, अशी वाटण्याजोगी आहे? सरकारला गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? बाळासाहेब ठाकरे स्वाभिमानी होते आणि हा माणूस किती स्वार्थी आहे? मी त्या दोघांनाही जवळून पाहिलं आहे," असेही ते म्हणाले.