मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Manipur Drone Attack) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू करण्याचा प्रयत्न कुकी दंगेखोरांनी केल्याचे निदर्शनास आले आहे. कुकी दंगेखोरांनी मणिपूरच्या कोत्रुक आणि कडंगबंद खोऱ्यात हल्ले केले. या हल्ल्यात कुकी दंगेखोरांनी सुरक्षा दलांवर ड्रोन हल्लेही केले आहेत. या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री २ वाजता दहशतवाद्यांनी डोंगराळ भागातून हल्ला केला होता. यावेळी झालेल्या गोळीबारामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. चिंतेची बाब म्हणजे यावेळी गावकरी घरातच होते. गोळीबारासोबतच दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर करून बॉम्ब हल्लेही केले आहेत. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
या हल्ल्यानंतर राज्यात शांतता राखण्यासाठी इंफाळमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे पाठवण्यात आले आहेत. तसेच, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्वसामान्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.