मुंबई : कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता सर्वच राज्यातील प्रशासकीय यंत्रणांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत. दरम्यान दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज नियमितपणे रुग्णालय परिसरात गस्त घालून विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पोलिसांकडून दररोज गस्त घातली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या दालनात दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी नुकतीच निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी बैठक झाली होती. यामध्ये सुरक्षा कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक अलार्म, ओळखपत्र व रुग्णालयात वाढणारी गर्दी याबाबत विचार करून सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात चर्चा झाली.
दरम्यन अतिरिक्त पोलीस आयुक्त देशमुख यांनी रुग्णालयीन अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर, विद्यार्थी व सर्व कर्मचारी यांनी ओळखपत्र घालणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज नियमितपणे रुग्णालय परिसरात गस्त घालून जेथे गैरप्रकार होण्याचे शक्यता जास्त आहे, तेथे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.