पुणे : राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भीमाशंकराला घातलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शेवटच्या श्रावण सोमवाराच्या निमित्ताने सर्व कुटुंबासह भगवान भीमाशंकराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भीमाशंकराचे दर्शन झाल्यानंतर मनाला एक समाधान मिळतं. ही प्राचिन वास्तू असल्याने इथे येण्याचं भाग्य महाराष्ट्रातील सर्वांना लाभतं. राज्यातील माझा बळीराजा सुखी होऊ दे, उदंड पीक येऊ दे आणि महाराष्ट्रातील जनता सुखी होऊ दे, असं साकडं मी भीमाशंकराला घातलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थनाही मी भगवान शंकराला केली आहे."
हे वाचलंत का? - मराठवाड्यात अतिवृष्टी! उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा
"आम्ही अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. भगवान भीमाशंकराने आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि यापुढेही असंच काम सुरु ठेवण्यासाठी आरोग्य, शक्ती, ऊर्जा आणि प्रेरणा द्यावी. भीमाशंकराच्या सर्व भक्तांना चांगले दिवस येऊ, दे हीच प्रार्थना आहे. याठिकाणी भक्तांसाठी ज्या ज्या सुविधा करता येतील त्या सर्व सरकार करेल," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.