"ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना..."; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

    02-Sep-2024
Total Views |
 
Chitra Wagh & Thackeray
 
मुंबई : ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले. ही फार मोठी शोकांतिका आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार?" असा सवाल त्यांनी केला.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आणि आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही," असेही त्या म्हणाल्या.