यशात त्यांनी जपले माणूसपण...

    02-Sep-2024
Total Views |


buisness men 
 
पैसा हाती आल्याने उन्मत्त झालेले अनेक आहेत. मात्र, यश आणि पैसा हे दोन्ही मिळून सुद्धा, त्याची हवा डोक्यात शिरू न देता माणूसपणाला महत्त्व देणार्‍या व्यावसायिक जगदीश शेट्टी यांच्याविषयी...
 
प्रत्येकालाच आपला स्वत:चा व्यवसाय असवा असे वाटत असते. अनेक जण त्यासाठी धडपड देखील करतात. अनेकांना त्यात यश येते, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. मात्र, यशस्वी झालेले अनेक असले तरी, ते यश सगळ्यांनाच पचवता येते असे नाही. कोणताही व्यावसायिक असो जेव्हा यशाच्या शिखराकडे पोहोचतो, तेव्हा त्याच्या डोक्यात यशाची हवा गेलेली असते, हे आपण इतरत्र सदैव पाहतो. त्यामुळे त्याच्यात अहंकार निर्माण होतो. असा मदामध्ये आंधळा झालेला हा उद्योजक त्याच्या अहंकाराच्या बोज्यानेच त्याच्या पतनाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतो. मात्र, याला जगदीश राघव शेट्टी हे अपवाद ठरत आहेत. लहानपणापासूनच वडिलांकडून हॉटेल व्यवसायाचे धडे घेत, उत्तुंग भरारी घेतलेल्या शेट्टी यांचे आज शहरात आलिशान हॉटेल आहे. मात्र, व्यवसायात उत्तुंग भरारी मारूनही माणूसपण त्यांनी जपले आहे.
 
मूळचे डोंबिवलीकर असलेल्या जगदीश यांचा जन्म मंगलोर येथे झाला. मात्र, त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र राहिली आहे. जगदीश यांचे वडील राघव यांचा परंपरागत हॉटेल व्यवसाय होता. त्यामुळे लहानपणापासूनच जगदीश यांची नाळ या व्यवसायाशी जोडली गेली. १९५५ साली त्यांच्या वडिलांची कल्याणला ‘मराठा खाणावळ’ होती. शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे हे हॉटेल होते. हॉटेल जरी कल्याणला असले तरी, शेट्टी कुटुंब डोंबिवलीत राहायला होते. त्यांनी तिसरीपर्यंतचे शालेय शिक्षण ’लुड्स इंग्लिश स्कूल’ येथून पूर्ण केले. त्यांनी चौथीचे शिक्षण महिला समितीमधून घेतले. पुढे त्यांनी साऊथ इंडियन स्कूलमधून एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण घेतले. १९७४ ला एस.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या आजोबांचे डोंबिवलीत ’विहार’ हॉटेल होते.
 
विहार हॉटेलमध्ये जगदीश शेट्टी १४ वर्षांचे असल्यापासून काम करत होते. दहावीनंतर नोकरीचा शोध घेत असताना हॉटेल ताजमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी जगदीश शेट्टी यांच्याकडे चालून आली. त्यावेळी त्यांना १०० रुपये विद्यावेतन दिले जात होते. दोन वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना, शिस्तीपासून हॉटेल व्यवसायाशी संबंधित सर्व गोष्टी शिकता आल्या. त्या शिक्षणाचा फायदा या व्यवसायात जगदीश शेट्टी यांना होत आहे. तिथूनच शिस्त कशी असावी, हे शिकलो आणि तीच आजतागायत हॉटेल व्यवसाय करताना पाळत आहे असे जगदीश शेट्टी सांगतात. हीच शिस्त पुढे जीवनाचाही भाग झाली. ग्राहक हा आपला देवच आहे असे ते मानतात.प्रशिक्षण संपल्यानंतर ८०० रुपये पगारावर, हॉटेल ताजमध्ये दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, १९७८ला जगदीश अबुधाबीला गेले. दोन वर्षे जर्मन ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केले. त्यानंतर, जगदीश डोंबिवलीत परतले. व्यवसायाच्या शोधात असतानाच त्यांना १९८५ मध्ये आमदार निवासचे एक टेंडर मिळाले. विधानभवनात चार सेशनच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे काम त्यांनी केले. संघ कार्यकर्ता व माजी खासदार रामभाऊ कापसे यांनी कॅन्टीन समितीमध्ये असताना, जगदीश यांचे नाव सुचविले होते. १३ जणांची एक कॅन्टीन समिती होती. त्या समितीत एक रामभाऊ कापसे होते. त्यानंतर विधानभवनाचे कॅन्टीन चालविण्याचे काम जगदीश यांना मिळाले.
 
जगदीश यांचे वडील हॉटेल व्यवसायात असले तरी, त्यांच्या आई रत्ना या गृहिणी होत्या. जगदीश यांचा मुलगा अभिषेक यांनीदेखील वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत, हॉटेल मॅनेजमेंटचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची मुलगी समीक्षा हिने फॅशन डिझायनिंग कोर्स केला आहे. मात्र, तिच्यातदेखील वडिलांचे गुण उतरल्याने ती उत्तम केक बनविते.
जानेवारी १९९० मध्ये जगदीश यांनी स्वत:च्या ’रंगोली’ हॉटेल व्यवसायाचा श्रीगणेशा केला, आणि कर्मभूमी डोंबिवली असलेल्या डोंबिवलीत जगदीश स्थिरावले. डोंबिवलीतील पहिले फॅमिली रेस्टॉरंट ‘रंगोली’ होते. त्यामुळे ते कसे चालेल, याविषयी जगदीश यांना भीती होती. त्यांनी घाबरतच या व्यवसायाला सुरुवात केली.
 
जगदीश हे उत्तम शेफ आहेतच. पदार्थ पाहून त्याची चव न घेता तो कसा झाला असेल, याचा ते अंदाज बांधतात. बदलत्या काळानुसार त्यांनी हॉटेल व्यवसायात बदलदेखील केले. पूर्वी फक्त रोटी-पराठा चालत असे. पण, आता ग्राहकांची पसंती गार्लिक नानला असते. त्यामुळे त्यांनी ग्राहकांच्या पसंतीनुसार पदार्थांमध्ये बदल केले. जगदीश हे प्रत्येक ग्राहकाच्या टेबलाजवळ जाऊन, प्रत्येकाची विचारपूस आत्मियतेने करतात. त्यामुळे साहित्यिकांपासून राजकीय नेते अशा सर्वच क्षेत्रांतील मंडळी, याच हॉटेलमध्ये येतात. मोठमोठे इव्हेंट या हॉटेलमध्ये होतात. आता मुलांच्या हातात व्यवसाय सोपवून सेवानिवृत्ती घेण्याच्या तयारीत जगदीश शेट्टी आहेत. चार पिढ्यांच्या ग्राहकांशी ते जोडलेले आहेत. गेल्या काही वर्षांत, अनेक हॉटेल शहरात उभी राहिली. पण, ग्राहकांची या हॉटेलशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. अशा या मनमिळाऊ आणि माणुसकी जपणार्‍या उद्योजकाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दैनिक ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
लेखक - जान्हवी मोर्य