गिधाडांविषयी बोलू काही...

19 Sep 2024 14:26:52

vulture conservation
 
मुंबई, दि. 18 : (MTB) दै. ‘मुंबई तरुण भारत’, ‘महाएमटीबी’, ‘विवेक पार्क फाऊंडेशन’चे ‘वाईल्ड रिसर्च डिव्हिजन’ आणि मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ने एकत्रित येऊन ‘गिधाडांविषयी बोलू काही...’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील प्रेमचंद रॉयचंद गॅलरीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमात महाराष्ट्रात संकटग्रस्त अशा गिधाडांवर काम करणारी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असून राज्यातील गिधाडांच्या संख्येचा, अधिवासाचा आणि संवर्धनाचा ते आढावा उपस्थितांसमोर मांडतील.
 
‘आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिना’चे निमित्त साधून ‘गिधाडांविषयी बोलू काही...’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात गिधाडांची संख्या वाढवण्याच्या अनषुंगाने विविध संस्था आणि व्यक्ती काम करत आहेत. या सगळ्यांनी मिळून केलेल्या प्रयत्नांचे एकत्रीकरण करून हे प्रयत्न एका व्यासपीठावर मांडण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’, ‘महाएमटीबी’, ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये ‘वनविभाग’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस), ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट-पुणे’, ‘ग्रीन वर्क्स ट्रस्ट’, ‘सोसायटी ऑफ इको एनडेंजर्ड स्पेसिज कंझर्वेशन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन’ (सिस्केप) आणि ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी नाशिक’ या संस्था सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमाला राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
 
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाएमटीबी’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ यांनी ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स अव्हेरनेस प्रोग्राम’ या व्हिडिओ मालिकेअंतर्गत तयार केलेल्या ‘नाशिकची गिधाडे’ या माहितीपटाच्या सादरीकरणाने होईल. त्यानंतर ‘बीएनएचएस’च्या ‘कॉन्झर्वेशन ब्रिडिंग स्पेशालिस्ट’ डॉ. काझवीन उमरीगर या गिधाडांच्या पिंजराबंद प्रजननाविषयी सादरीकरण करतील. नाशिक जिल्ह्यातील गिधाडांच्या परिस्थितीविषयी वन्यजीव जीवशास्त्रज्ञ प्रतिक्षा कोठूळे आणि जिल्ह्यातील गिधाडांच्या बचावकार्यासंबंधी रेस्क्यू-नाशिकचे हेड (ऑपरेशन) अभिजीत महाले हे माहिती देतील. फणसाड वन्यजीव अभयारण्यात सुरू असणार्‍या गिधाड पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी ‘ग्रीन वर्क्स ट्रस्ट’च्या ‘कॉन्सर्विंग जटायू’ प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर मिनार साळवी सादरीकरण करतील. तसेच रायगड जिल्ह्यातील गिधाडांच्या परिस्थितीवर ‘सिस्केप’चे प्रतीक देसाई भाष्य करतील. कार्यक्रमात ‘सीताई क्रिएशन्स’ची कलाकार मंडळी गिधाडांवरील आधारित नाटुकलीचे सादरीकरण करतील. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करता येईल.
 
 
Powered By Sangraha 9.0