"...तर दीड हजारांचे २ हजार आणि दोनचे ३ हजार होतील!" मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य

19 Sep 2024 17:32:22
 
 
Shinde
बुलढाणा : तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजारांचे २ हजार आणि दोनचे ३ हजार होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. गुरुवारी बुलढाणा येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान आणि शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद माझ्या लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात येताना होतोय. तुमची माया आणि प्रेम पाहून वाटतं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी आणि सुपरहिट झाली. काही लोकं ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले, काही लोकं नागपूरच्या कोर्टात गेलेत. काँग्रेसचे आमदार सुनील केदार म्हणाले की, काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहिण योजना बंद करु. पण माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना जनाची नाहीतर मनाची तरी वाटली पाहिजे. काही लोकांना वाटलं की, ही योजना निवडणूकीचा जुमला आहे आणि फसवी आहे. पण एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील हे तुम्हालाही वाटलं नसेल."
 
हे वाचलंत का? -  पवार ठाकरेंच्या नाकावर टीच्चून बाळासाहेब थोरातांचं वक्तव्यं! मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार!
 
"महायूती सरकारने जे बोललं ते केलं. एवढ्या कमी वेळात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणारी ही पहिली योजना आहे. दिलेला शब्द पाळणारं आपलं सरकार आहे. यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं पण हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. विरोधकांनी ही योजना जेवढी बदनाम करता येईल तेवढी केली. ज्या काँग्रेसने गेल्या ६० वर्षात देशाचं वाटोळं केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार?" अशी टीका त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले की, "लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही केवळ १५०० रुपयांवर थांबणार नाही. तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजारांचे दोन हजार आणि दोन हजारांचे अडीच हजार होतील. तुम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजारांचे तीन हजार होतील आणि तीन हजारांपेक्षाही जास्त पैसे देण्याची संधी आम्हाला मिळाली तर आम्ही आमचा हात आखडता घेणार नाही," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0