जनमानसांत हृदयसिंहासनी विराजमान, कार्यकर्तृत्वाच्या उत्तुंग शिखरावर आसनस्थ, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांनी आमदार या नात्याने आपल्या विकासपर्वाच्या 20 वर्षांत देदीप्यमान कार्य केले आहे.
‘आमदार कन्यादान योजने’च्या माध्यमातून मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दीड हजारांहून अधिक कन्यांचे त्यांनी कन्यादान केले. गोरगरिबांना या योजनेच्या साहाय्याने मदतीचा नुसता हात आणि आधारच दिला नाही, तर प्रत्येक कुटुंबाशी आपुलकीचा जिव्हाळा निर्माण केला. निव्वळ प्रासंगिक न राहता, आवर्जून विचारपूस करीत या कुटुंबीयांना परिवार म्हणून जोडले. अशा पितृतुल्य असामान्य व्यक्तिमत्वास आशीर्वादांच्या शृंखलेत आणखी एक भर पडली. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना श्रावण महिना. या महिन्यात बदलापूर ते कोंडेश्वर अशी दरवर्षी कावड यात्रा निघते. स्वतः या यात्रेस उपस्थित राहून यात्रेकरूंच्या यात्रेत कोणतीच कमतरता भासणार नाही, याची जातीने काळजी घेऊन हिंदुत्वाची अखंड ज्योत कथोरे यांनी तेवत ठेवली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनी, आजच्या धावपळीच्या व घरातील कामात नेहमीच व्यस्त असणार्या माय-माऊलींना तीर्थाटन घडावे, म्हणून सुमारे 65 हजारांहून अधिक महिलावर्गास नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाची यात्रा घडविली. या सर्व यात्राकाळात दस्तुरखुद्द हजर राहून कोणतीही आबाळ होणार नाही, याची काळजी घेतली.
सर्व यात्रेकरू महिलावर्ग समाधानाने आशीर्वाद देत राहिल्या. आ. किसन कथोरे यांनी सलग 20 वर्षांच्या विकासपर्वाच्या कार्यकाळात मतदारसंघाचा चेहरामोहराच बदलून टाकला. डांबरीकरणामुळे खड्डेग्रस्त नागरिकांसाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करुन मतदारसंघात सर्वत्र रस्त्याचे जाळे निर्माण केले. अगदी ग्रामीण भागांतसुद्धा काँक्रीटचे रस्ते देऊन सर्वांना दिलासा दिला. एक स्वप्न पाहिले होते साहेबांनी! ते म्हणजे, श्री क्षेत्र मलंगगडावर येण्या-जाण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीचे. प्रचंड संघर्षांतून आता ते स्वप्न पूर्णत्वास जात आहे. माळशेज घाटमाथ्यावर पर्यटनाचे आकर्षण म्हणून काचेचा पूल (sky walk) बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. सोनिवली येथे भव्यदिव्य असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकार होत असून, उल्हास नदी किनार्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे कामसुद्धा प्रगतिपथावर आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि उल्हास नदीच्या मुशीत वसलेल्या बदलापूरमध्ये सर्वाधिक झपाट्याने शहरीकरण होत असून, फार मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे वास्तव्यास येत आहेत. पाणीबाणीची समस्या उद्भवू नये, म्हणून पाणी आरक्षणासह ‘अमृत योजना टप्पा दोन’ अंतर्गत सुमारे 241 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीची योजना मंजूर करून घेतली. नदीकिनारी शिवशंकराची भव्यदिव्य मूर्ती बसविण्यात येणार असून मूर्ती आकारास येत आहे.
दरवर्षी कीर्तन महोत्सव आयोजित करुन स्वतः भाग घेणारे आमदार साहेब वारकरी पंथाच्या गळ्यातील ताईत बनले असून, भाविकांची अध्यात्मिक भूक भागवताना या क्षेत्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली जातात.
सुमारे 550 वर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे जन्मस्थानी रामललाचे भव्यदिव्य मंदिर पूर्णत्वास जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा याचवर्षी पार पडला. संपूर्ण देशभर उत्सवाचे वातावरण होते. बदलापूर शहरातसुद्धा आमदार किसन कथोरे यांनी ‘श्रीराम महोत्सव’ आयोजित करून नागरिकांना आठ दिवस रामनामाच्या भजन-कीर्तनात व गीतरामायणाच्या कार्यक्रमाचा लाभ घेत कारसेवकांचासुद्धा यथोचित सन्मान करून श्रीराम प्रभूंची रथयात्रा मिरवणूक काढत उल्हासनदी येथे गंगा महाआरती करत मोठ्या उत्साहात अभूतपूर्व अशी शोभायात्रा संपूर्ण शहरात काढली.
बारवी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारी नोकर्या मिळवून दिल्याच, परंतु बदलापूर शहरासाठी भविष्यात लागणारे अतिरिक्त पाणी आरक्षित करून ठेवले. ही दूरदृष्टी फक्त आणि फक्त आमदार किसन कथोरे यांच्याकडेच आहे. याशिवाय, अनेक सामाजिक उपक्रम, मग त्यामध्ये ‘दत्तक कन्यादान योजना’ असेल, मुलीच्या जन्माचे स्वागत असेल, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना औषधोपचार देणे असेल किंवा रुग्णांना मदत करणे अशी एक ना अनेक सामाजिक कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व विकासाभिमुख दूरदृष्टीमुळे त्यांच्या वर्णनासाठी शब्दच अपुरे पडतील. प्रत्येक कार्यकर्त्यावर पित्याप्रमाणे माया करणारे, आपुलकीने चौकशी करून सरांना आधार देणारे आमचे आधारस्तंभ आप्पा - आदरणीय किसन कथोरे शतायु व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
शब्द पाळणारा नेता
मुरबाड भाजप शहराध्यक्षपदावर आज मी कार्यरत आहे. मुरबाड शहरात पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या होती. आमदार झाल्यावर सर्वात आधी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवीन, असा शब्द कथोरे साहेबांनी दिला होता. आज शहरातील घराघरांत नळ पाणी योजनेचे स्वच्छ पाणी येते. त्यामुळे माता-भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणूनच मी कथोरे साहेबांचा उल्लेख अभिमानाने ‘दिलेला शब्द पाळणारा नेता’ असा करतो.साहेबांच्या कारकिर्दीत मुरबाड शहराचा चेहरामोहराच बदलला. सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बंदिस्त गटारे, तंटामुक्त शहर असे अनेक बदल घडले. तसेच आज शहरात चौकाचौकांत हॅलोजन ‘फ्लड लाईट’चे मोठमोठे खांब उभे राहिले आहेत. शहरातील मासळी मार्केटची दुरवस्था झाली होती. साहेबांनी त्यांच्या फंडातून मासळी मार्केटची नवीन सुसज्ज इमारत उभी केली.शहरामध्ये अग्निशमन दलाची कमतरता असताना आधी एमआयडीसी अणि मुरबाड नगर पंचायतीची स्वतंत्र अग्निशमन दलाची योजना साहेबांच्या प्रयत्नांमुळे मूर्त स्वरूपात आली. शहरातील शासकीय रुग्णालयात जातीने लक्ष घालून आवश्यक सुधारणा करून घेतल्या. शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करत आज त्यांनी शहरात हाकेच्या अंतरावर पदवी महाविद्यालय अणि कायदा पदवी महाविद्यालय आणले. मुरबाड नाक्यावर तिरंगा चौकात साहेबांच्या पुढाकाराने थाटात उभारलेला आपल्या भारताचा तिरंगा हा आम्हा मुरबाडवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मुरबाड शहरातील तलावाचे सुशोभीकरण करून शेजारी शिवमंदिर बांधून कथोरे साहेबांनी मुरबाडकरांना एक अनोखी भेट दिली आहे. मुरबाड शहराचा विकास अत्यंत नियोजनबद्ध रितीने करून कोणाच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी साहेबांनी नेहमी घेतली. मुरबाड शहर हे राज्यातील एक आधुनिक शहर करायचे स्वप्न साहेबांनी पाहिले आहे अणि ते लवकरच या स्वप्नाला सत्यात उतरविणार, यात मला तीळमात्र शंका नाही. आज साहेबांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा!
- सुधीर (भाई) तेलवणे, मुरबाड भाजप शहराध्यक्ष
दीड हजार लेकींचे कन्यादान
बदलापूर-मुरबाड विधानसभा क्षेत्रातील अशा मुली ज्यांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले आहे, अशा सुमारे दीड हजारांहून अधिक मुलींचे त्यांच्या विवाहात कन्यादान मागील पाच वर्षांत आ.किसन कथोरे यांनी केले आहे. अगदी मुलीच्या पित्याला शोभेल असा पेहराव, कन्यादानाचा पूर्ण विधी, भेटवस्तू देण्यापासून मंडपात तेवढा वेळ देण्याचे पुण्यकर्म आमदार कथोरे यांनी केले आहे.
ध्यास तलावांच्या संवर्धनाचा...
महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य सरोवर संवर्धन योजने’अंतर्गत आ. किसन कथोरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक जीर्ण झालेल्या तलावांचे संवर्धन केले आहे. तलावांची स्वच्छता करणे, गाळ उपसणे, तलावांची डागडुजी करणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आदी कामे केली. त्यामुळे या पाण्याचा उपयोग शेतीसाठी झाला. काही तलावांमध्ये बोटींगची व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिक अणि बच्चे कंपनीसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून तलाव परिसर विकसित केले आहेत.
‘संगम’ तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा
मुरबाड-किन्हवली रस्त्यावर काळू नदी अणि डोईफोडी या दोन नद्यांचा संगम आहे. पूर्वापार येथे अनेक धार्मिक विधी होतात. येथे स्वातंत्र्यपूर्वकालीन शिवमंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणून ओळख आहे. येथील शिव मंदिराची डागडुजी, परिसराचे सुशोभीकरण ही कामे सुरू करून आमदार कथोरे यांनी हा परिसर मुरबाड तालुक्यातील पर्यटनक्षेत्र म्हणून नावारूपास आणायचा संकल्प केला आहे. राज्य शासनाने या ठिकाणाला तीर्थक्षेत्रासोबत आता पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. येथे श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, गुरूपौर्णिमा आदी सणांना मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणार्या पर्यटकांसाठी संगमेश्वर हे ठिकाण पर्वणी ठरणार आहे.
देशातील पहिला काचेचा स्कायवॉक माळशेज घाटात
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे मुरबाडजवळील माळशेज घाट. या माळशेज घाटाला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याला देश नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्याचे स्वप्न मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी पाहिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने अणि खासगी कंपनीच्या सहकार्याने माळशेज घाटात आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील पहिले-वहिले काचेचे स्कायवॉक अणि व्ह्यूविंग गॅलरी साकार होणार आहे. राज्य अणि केंद्राने या उपक्रमास मंजुरी दिली असून, अंदाजित 266 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. स्कायवॉक, गॅलरीसोबत येथे पर्यटक भवन, अॅम्पी थिएटर, कॉफी शॉप, संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आदी आकर्षणे असणार आहेत. यासाठी वनविभागाची दहा हेक्टर जागा राज्य शासनाने संपादित केली आहे. 115 मीटर लांबीच्या या काचेच्या स्कायवॉकवरुन चालताना हवेत चालत असल्याचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. इंग्रजी ‘ओ’ अक्षराच्या आकारातील व्ह्यूविंग गॅलरीमधून पर्यटकांना सुमारे 700 फूट खोल दरीचे सौंदर्य पाहता येणार आहे. हा जगातील सर्वात लांब स्कायवॉक असेल, असा दावा आमदार कथोरे यांनी केला आहे.
माळशेजच्या पायथ्याशी प्रस्तावित वारकरी भवन
माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सावरणे या गावाच्या हद्दीत आमदार कथोरे यांच्या संकल्पनेतून भव्य असे वारकरी भवन उभारले जात आहे. या वारकरी भवनाच्या उभारणीसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा या वारकरी भवनात असतील. वारकर्यांची राहण्याची अणि भोजनाची मोफत व्यवस्था येथे करण्यात येणार आहे.
कथोरे साहेबांमुळे मुरबाडमध्ये आमूलाग्र बदल
एका कामानिमित्त साहेबांशी भेट झाली आणि आपसूक साहेबांशी नाते जुळले. दोन-तीन वर्षे कथोरे साहेबांसोबत खूप काम केले. 2012 मध्ये पंचायत समितीची पहिली निवडणूक लढलो आणि वयाच्या 28व्या वर्षी सर्वात तरुण सदस्य म्हणून निवडून आलो. पुढे माझी पत्नी सीमा घरत यादेखील पंचायत समितीच्या सभापती झाल्या. हे केवळ साहेबांच्या मार्गदर्शनामुळे घडले. आदिवासी पट्ट्यात रस्ते, पाणी, आरोग्य, दळणवळणाची साधने यांत सुधारणा केली. आश्रमशाळांच्या इमारतींचा विकास, पायाभूत सुविधा वाढल्या. पेंढरी धरणाच्या कामाला मंजुरी मिळवून दिल्याने आता लवकरच आमची कनकविरा नदीमध्ये बारमाही पाणी वाहेल, ज्याचा फायदा शेतकर्यांना होऊन ते सधन होतील. साहेबांच्या कार्यकाळात माळशेज घाटातील रस्ते, विविध पर्यटन पॉईंट्स विकसित झाल्याने येथील आदिवासी समाजाला रोजगार मिळाला. साहेब स्पष्टवक्ते आहेत. एखाद्याचे काम होणार नसेल, तर स्पष्ट ‘नाही’ सांगतील, पण आश्वासनांच्या खैराती वाटून सामान्य व्यक्तीला उंबरठा झिजवायला लावणार नाहीत. अशा या कर्तृत्ववान नेत्याला वाढदिवशी अनंत शुभेच्छा!
- अनिल घरत, वैशाखरे, मुरबाड
साहेब म्हणजे शाश्वत विकासाची नांदी!
कथोरे साहेबांनी मुरबाड तालुक्यात आमूलाग्र बदल केला. पूर्वीचा मुरबाड अणि आताचा मुरबाड यामध्ये जो आमूलाग्र बदल झाला आहे, तो साहेबांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळेच. साहेबांनी गावागावांत भांडणतंटे मिटवले. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाईला राजकारणात आणले. कार्यकर्त्यांची फळी उभारताना ‘आधी कुटुंबाचा उदरनिर्वाह महत्त्वाचा’ ही शिकवण त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. स्थानिक राजकारणात विविध पदांवर बसविले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास दृढ झाला. घरोघरी नळ योजना सुरू करून महिलांची मोठी समस्या त्यांनी दूर केली. शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत त्यांनी तालुक्यात युपीएससी/एमपीएससी स्पर्धापरीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. जिल्हा परिषदेचा निधी अपुरा पडत असल्याने तालुक्यातील बहुसंख्य रस्ते त्यांनी सार्वजानिक बांधकाम खात्याकडे वर्ग करून तालुक्यात मोठा निधी आणला. आपल्याकडे समस्या घेऊन येणारी व्यक्ती कोणत्या पक्षाची, जातीची आहे, कोणाची शिफारस घेऊन आली आहे, याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना उदंड आयुष्य लाभो, ही सदिच्छा. धन्यवाद!
- अॅड. सचिन चौधरी, मुरबाड
द काँक्रीट मॅन
आमदार किसन शंकर कथोरे हे नेतृत्व केवळ मुरबाड विधानसभेपुरते सीमित नसून, हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्रात ‘द काँक्रीट मॅन’ या नावाने ओळखले जाते. कारण, कथोरे साहेबांनी संपूर्ण मुरबाड विधानसभा मतदारसंघात शहरी भाग असो वा गाव, पाडा किंवा आदिवासी वाड्या अशा अतिदुर्गम भागांपर्यंतसुद्धा सिमेंट-काँक्रीटचे रस्ते पोहोचवून शाश्वत विकास घडवून आणला आहे.
कोरोना महामारीच्या थोडे दिवस आधीच आमदार किसन कथोरे यांना भारतीय जनता पक्ष ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. साहेबांनी कार्यकर्त्यांची फळी तयार करून मुरबाड तालुक्यातील 80 टक्के ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारांची मंडळी सरपंच व सदस्य, या नात्याने निवडून आली. मुरबाड नगर पंचायत निवडणुकीतदेखील एकहाती सत्ता मिळवत कथोरे साहेबांनी दिलेली सर्व वचने पूर्ण करून विकासाचे मॉडेल प्रस्थापित केले आहे.
बदलापूर शहराकरिता राज्य शासनाकडून सुमारे 242 कोटी निधीची पाणी योजना कथोरे साहेबांच्या पुढाकाराने मंजूर झाली आहे. योजनेचे काम सुरू असून शहरात एकूण 21 पाण्याच्या टाक्या बांधणे प्रस्तावित असून, त्यांपैकी पाच टाक्यांचे काम सुरू आहे. या योजनेतून शहरातील जुन्या पाईपलाईनदेखील बदलण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवाशांच्या समस्या प्रलंबित होत्या. जुलै 2023 मध्ये किसन कथोरे साहेबांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची भेट घेऊन बदलापूर, वांगणी, टिटवाळा, खडवली आदी रेल्वे स्थानकांच्या समस्या मांडल्या. तसेच कांजुर ते बदलापूर असा मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाचा डीपीआर इटलीतील ‘मिलान मेट्रो’च्या धर्तीवर तयार करून त्याचा मुख्यमंत्री अणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. विकासाचा व समाजसेवेचा रथ अविरतपणे ओढणार्या किसन कथोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त कथोरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
- डॉ. मिलिंद धारवडकर, संयोजक आयटी सेल, कोकण ठाणे विभाग, भारतीय जनता पक्ष
ईश्वरभाई पटेल