डोंबिवली : कधीकाळी एकत्र कुटुंबपध्दतीचे प्रस्थ होते. मात्र सध्याच्या जमान्यात विभक्त कुटुंबपध्दतीचे स्तोम माजले असताना एकत्र कुटुंब पध्दतीचा वारसा चिंचोडयाचा पाडा येथील पाटील कुटुंबियांनी जपला आहे. एकत्रित राहून गणेशोत्सव देखील एकत्रित साजरा करणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या गणपतीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अनंत चतुदर्शीपर्यंत विराजमान होणा-या गणपतीच्या दर्शनासाठी आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार यांची गर्दी होत असताना सेलिबेट्रींची लाभणारी उपस्थिती ही पाटील यांच्या गणपतीची खासियत आहे.
परशुराम पाटील यांनी या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. सुरूवातीच्या काळात हा गणपती दीड दिवस बसविला जात होता. मात्र परशुराम यांचा ज्येष्ठ पूत्र उत्तम यांच्या जन्मानंतर गणपतीची प्रतिष्ठापना अनंत चतुदर्शी पर्यंत करण्यात येऊ लागली. परशुराम आणि विठाबाई यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. परशुराम हे सुप्रसिध्द कलावंत आणि कुस्तीपटू होते. उत्तम पाटील आणि त्यांच्या बंधूना वडिलांकडून कला आणि क्रिडेचा वारसा प्राप्त झाला आहे. कबड्डी आणि लोकसंगीत या क्षेत्रात ठाणे जिल्ह्यात पाटील बंधूचा नावलौकिक आहे. आगरी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या परशुराम यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक लोकगीते गायली आहेत. महाराष्ट्राचे लोक गायक आणि कल्याण चे रहिवासी प्रल्हाद शिंदे यांचेही नेहमी पाटील यांच्या घरी येणे-जाणे असे. प्रसिध्द शाहीर विठ्ठल उमप हे देखील त्यांच्या घरी येऊन गेले आहेत. गणेशोत्सवात खेळाडू आणि कलावंताच परशुराम यांच्या घरी नियमित येणे असायचे. परशुराम यांच्या पश्चातही खेळाडू आणि कलावंत आज ही बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. आणि त्यांचे आदरतिथ्य पाटील कुटुंबियांकडून तितक्याच आत्मीयतेने केले जाते. बाप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सत्यनारायण पूजेच्या दिवशी तर शेकडो भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. कुटुंबांतील सुना, मुली मिळून स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात. या कामात त्यांना पुरूष मंडळीचे सहकार्य लाभते.
परशुराम यांना पाच अपत्य उत्तम, विद्या, आनंद, प्रताप आणि धाकटे सुपुत्र कमलाकर यांच्यासह सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. हे सर्वजण एकत्रित येऊन गणेशोत्सवाचा सण साजरा करतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आवर्जुन त्यांच्या घरी दर्शनासाठी आले होते. तसेच सुप्रसिद्ध गायक दादुस अणि इतर ही विविध राजकीय, सामाजिक, उद्योग आणि कला क्षेत्रातील मान्यवर दरवर्षी उपस्थित असतात. पाटील कुटुंबियांनी या वर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मूर्तीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली असून पाटील कुटुंबियांचे जावई जनार्दन भोईर यांनी केलेली सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.