पुण्यात झिकाच्या ५ रुग्णांचा मृत्यू; रुग्णसंख्या पोहोचली शंभरवर

16 Sep 2024 11:35:12

ZIKA
 
पुणे : (ZIKA Virus) पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ कायम असून, आता एकूण रुग्णांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत शहरात झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
शहरातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक २० रुग्ण आहेत. त्या खालोखाल एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयात १६ रुग्ण आहेत. खराडी १३, घोले रस्ता व पाषाण प्रत्येकी ९, सुखसागरनगर व मुंढवा प्रत्येकी ७, वानवडी ५, कळस ४, कोरेगाव पार्क व आंबेगाव बुद्रुक प्रत्येकी ४, लोहगाव २, विश्रामबागवाडा आणि धनकवडी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. शहरातील एकूण १०० रुग्णांपैकी ४५ गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
 
शहरात झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात खराडीतील ७२ वर्षीय पुरुष, पाषाणमधील ९५ वर्षीय स्त्री, बाणेरमधील ७८ वर्षीय पुरुष, कोथरूडमधील ६८ वर्षीय पुरुष आणि कर्वेनगरमधील ७६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व जण ज्येष्ठ नागरिक असून, त्यांना सहव्याधी होत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या रुग्णांचे वैद्यकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची मृत्यू परीक्षण समिती या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणार आहे. त्यानंतर हे मृत्यू कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे.
 
शहरातील झिकाचा प्रादुर्भाव
 
- एकूण रुग्णसंख्या - १००
- गर्भवती रुग्ण - ४५
- रुग्ण मृत्यू - ५
 
 
Powered By Sangraha 9.0