चीन हा कायमच अतिमहत्त्वाकांक्षी देश म्हणून परिचीत आहे. आशियातील एकमेव महासत्ता आपणच असावे ही चीनची महत्त्वाकांक्षा जगापासून कधीच लपली नाही. महासत्ता होण्याच्या मार्गावर अग्रेसर चीन, महत्त्वाकांक्षासिद्धीसाठी विविध मार्गांचा अवलंब करत असतो. मानसिक युद्धनीती हा त्याचाच प्रकार एक! तसा हा प्रकार भारतीय युद्धनीतीमध्ये प्राचीन असला, तरी सध्या त्याचा प्रभावी वापर चीन करताना दिसत आहे. यामध्ये शत्रूच्या गोटातील तपशीलवार माहिती मिळवून, त्याच्या आधारे विविध मार्गांद्वारे प्रत्यक्ष युद्धाआधीच शत्रूच्या मनात पराभवाची भीती निर्माण करणे हाच असतो. असा विजयाची खात्री नसलेला शत्रू रणांगणात दोन हात करण्याऐवजी, वाटाघाटी करण्यातच धन्यता मानतो आणि चीनला हवे असलेले दान अलगद त्याच्या पदरात टाकतो. चीन भारतावरदेखील याच युद्धप्रकाराचा वापर करत आहे. चीनच्या या मानसिक युद्धनीतीचा या लेखात घेतलेला आढावा...
मानसिक युद्धाच्या आधारे तैवानचेचीनमध्ये विलिनीकरण:
अमेरिका आणि मित्र राष्ट्रे तैवानची लढण्याची क्षमता सातत्याने वाढवत आहेत. ही क्षमता आता एवढी वाढली आहे की, तैवानवरती समुद्रातुन हल्ला करून तैवानवरती चीनने कब्जा करण्याची शक्यता कमी होत आहे. चीनने तैवान वरती हल्ला केला तर, त्यांना खूप रक्त सांडावे लागेल, ज्या करता चिनी जनता कधीही तयार होणार नाही. म्हणून आता चीन वेगळ्या प्रकारच्या युद्ध पद्धतीने, तैवान वर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एक पद्धत आहे ’कॉग्निटिव्ह वॉर फेअर’ म्हणजेच ’मानसिक युद्ध’. आजच्या युद्धक्षेत्रात शस्त्रास्त्रांपेक्षा मनावर हल्ले करणारी शस्त्रे अधिक प्रभावी ठरत आहेत. या युद्धात,माहिती,विचार आणि भावना यांचा वापर करून, लोकांच्या विश्वासांवर, निर्णयांवर आणि कृतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
या युद्ध पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजिन्ससारखे तंत्रज्ञानाच्या आधारे शत्रू राष्ट्राच्या मनावरतीच कब्जा करायचा, त्यामुळे त्या राष्ट्राचे होणारे सर्व निर्णय हे चीनच्या बाजूनेच कौल देणारे असतील. म्हणजेच तैवानच्या मनावरती विजय मिळवून, युद्ध न करता तैवानचे चीनमध्ये विलिनिकरण करायचे.
मानसिक युद्ध:
चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, 2030 पर्यंत जगातली महाशक्ती होण्याचा प्रयत्न करत आहे. या मानसिक युद्धामध्ये चीन मिलिटरी आणि सिविल दोन्ही या क्षेत्रांचा वापर करून, ही लढाई जिंकणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर युध्द भुमीच्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये केला जाईल , ज्यामध्ये इन्फर्मेशन प्रोसेसिंग, अनमॅन्ड वेपन्स आणि डिसिजन मेकिंग क्षेत्र असतील. तर मानसिक युद्धाचा वापर करून चीन आधुनिक पद्धतीने लढाई लढेल.
आजकाल मानसिक युद्ध ही एक महत्त्वाची युद्ध पद्धती म्हणून पुढे येत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी याचा वापर लँड वॉर फेअर, मेरीटाईम वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, स्पेशल वॉरफेअर युध्दात वापर करणार आहे.
प्रचंडप्रमाणा शत्रूराष्ट्रांचा डेटा गोळा करायचा
हे युध्द लढण्याकरता चीन प्रचंड प्रमाणामध्ये शत्रू राष्ट्रांची माहिती, नेतृत्वाची खाजगी माहिती, इतर माहितीचे संकलन साम, दंड, भेद याचा वापर करून मोठ्या प्रमाणात करत आहे .हा डेटा गोळा झाल्यानंतर या डेटाचे मायनिंग केले जाईल. आणि मग त्यांचे विश्लेषण करून, नेमके कसे युध्द लढायचे, हे ठरवले जाईल. चीनने अमेरिकेचा डेटा मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केला आहे. 2015 मध्ये अमेरिकेला समजले की, त्यांच्या सरकारची वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती चोरीला गेली आहे. आणि हे केवळ एकदाच झाले असे नाही, अनेक वेळा अमेरिकेच्या सरकारची माहिती चोरण्यात आली. आता ही माहिती एक शस्त्र(ुशरिेपळूरींळेप ेष वरींर) म्हणून चीन येणार्या काळामध्ये वापरू शकतो.
वापर आपल्या सैनिकांवरती सुद्धा
चीन मानसिक युद्धाचा वापर त्यांच्या सैनिकांवरती सुद्धा करत आहे. चीन संशोधन करत आहे की, त्यांचे सैनिक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागतात, काम करतात. यासाठी चीनने त्यांच्या सैनिकांच्या मनगटावरती ’स्मार्ट सेंसर ब्रेसलेट’ लावले असून, या ब्रेसलेटच्या माध्यमातून चीन त्यांच्या सैनिकी नेतृत्वाची माहिती गोळा करत राहील. यामध्ये सैनिकांचे हाव भाव, मानसिकता, मनस्थिती वगैरे याचा समावेश असणार आहे. यामुळे त्या सैनिकांच्या मजबित आणि कमकुवर दुवे परिस्थिती मध्ये कळतील. ज्यामुळे योग्य सैनिक, योग्य कामाकरता वापरणेे, चीनला सोपे जाईल. कारण लढाईचे सर्वात महत्त्वाचे तत्व असते ’राईट मॅन, ऍट राईट प्लेस, ऍट राईट टाईम.’
चीनची मानसिक युद्धनिती किती यशस्वी होईल? यामाध्ये तुम्ही कशा प्रकारे अल्गोरिदम तयार करता हे सर्वात महत्त्वाचे असून, त्याच्या आधारे आलेल्या माहितीचे योग्य विश्लेषण करता येईल. तसेच मिळालेली माहिती ही कुठल्या दर्जाची आहे? हे सुद्धा यावरून कळेल. कारण चांगली माहिती गोळा केली तरच, त्या माहितीचे चांगले विश्लेषण करता येईल.
विश्लेषण करून उपाययोजना
आज चीन प्रचंड प्रमाणामध्ये मानसिक युद्धनितीचा वापर, तैवान आणि हाँगकाँगच्या विरोधात करत आहे. हाँगकाँग आणि तैवान ही चीनसाठी एक प्रयोगशाळा आहे, जिथे चीन मान्सिक युद्धनिती वापरत आहे. याशिवाय मानसिक युद्ध नितीचा वापर चीन, अमेरिका आणि युरोपच्या विरोधात सुद्धा करत आहे. याचा अभ्यास करून भारताने, चीन ही युद्ध पद्धती भारताविरुद्ध कशी वापरेल किंवा वापरत आहे, याचे विश्लेषण करून उपाययोजना करायला सुरुवात केली पाहिजे.
चीन भारताच्या विरुद्ध कॉग्निटिव्ह युद्धाचा वापर कसा करत आहे
चीन भारताच्याविरुद्ध मानसिक युद्ध तंत्राचा वापर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करत आहे. या तंत्राचा उद्देश भारत सरकारची, जनतेची, मानसिकता बदलणे, त्यांना गोंधळात टाकणे, हा आहे. चीन या युद्ध तंत्रामध्ये माहिती, प्रचार, मनोवैज्ञानिक तंत्रे, आणि सायबर ऑपरेशन्सचा समावेश करून, भारताच्याच्या धोरणांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मानसिक युद्धाच्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत:
माहितीचा शस्त्र म्हणून वापर (Weaponization of Information)
चीन भारताच्याविरुद्ध माहिती युद्ध तंत्राचा वापर करत आहे. भारताच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. चीन खोटी माहिती, प्रोपगंडा आणि खोट्या बातम्या पसरवून, भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. जनमत बदलून चीन भारतीय समाजाचा देशावरील विश्वास कमी करण्याचे तंत्राचा अवलंब करतो. काही दिवसापूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांनी विधान केले होते की, चीन भारताकरता एक मोठी समस्या आहे . या विधानावरती 9 सप्टेंबरला चीनचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने अग्रलेख लिहिला. डॉक्टर जयशंकर यांचे चीनच्या विरोधातील परराष्ट्र धोरण हे, भारताकरता धोकेदायक आहे. त्याचा परिणाम भारताच्या राष्ट्रीय हितावरती होईल. हे धोरण अनेक भारतीयांना मान्य नाही, जे पूर्ण असत्य आहे. म्हणजेच ग्लोबल टाइम्स भारत सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
सायबर हल्ले आणि तंत्रज्ञान चोरणे
चीन सायबर हल्ल्यांद्वारे भारताच्या सरकारी, सैनिकी आणि आर्थिक संस्थांवर हल्ला करून, गुप्त माहिती गोळा करत आहे. सायबर हल्ल्यांमुळे भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, आणि त्यांच्या निर्णयक्षमतेला गोंधळात टाकले जाते. तंत्रज्ञान चोरणे हे देखील मानसिक युचे महत्त्वाचे अंग आहे, ज्याद्वारे चीन भारताच्या विकास धोरणांवर थेट परिणाम करतो.
मनोवैज्ञानिक ऑपरेशन्स (Psychological Operations)
चीन भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर परिणाम करण्यासाठी, मनोवैज्ञानिक ऑपरेशन्सचा वापर करतो. चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक, आणि सामाजिक संघर्षांना, जसे की माओवादाला चालना देत आहे. अशा प्रकारे, भारतात अंतर्गत संघर्ष आणि असंतोष निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
संस्कृतीचे प्रभावशाली शस्त्र म्हणून वापर करून, चीन सॉफ्ट पॉवर धोरणाचा वापर करत, भारतीय विचारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. सांस्कृतिक संस्थांचे (जसे की Confucius Institutes) माध्यमातून, चीन भारताच्या शैक्षणिक संस्था आणि विचारसरणींवर प्रभाव टाकतो.
प्रोपगंडा आणि माध्यमांवर नियंत्रण
चीन आपल्या प्रोपगंडा मशीनचा वापर भारताच्याच्या विरोधात करत आहे. चीन आपले राष्ट्रहित सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक माध्यमांवर नियंत्रण ठेव आणि त्याद्वारे भारताच्याविरुद्ध चांगली आणि प्रभावी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो. चीनच्या प्रभावाखाली आलेल्या माध्यमांद्वारे चीनची बाजू अधिक सकारात्मक, आणि भारताच्याची नकारात्मक दाखवली जाते.
वैज्ञानिक सहकार्य आणि डेटा चोरी
चीन भारताच्या वैज्ञानिक समुदायाशी सहकार्य वाढवून, गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संशोधन संस्थांचा गोपनीय डेटा चोरणे, तंत्रज्ञान हस्तगत करणे, आणि भारताच्याच्या धोरणात्मक योजना धोक्यात आणणे यांचा समावेश होतो. चीनचे मानसिक युद्धनितीचे धोरण हे भारतीय संस्थांवर, समाजावर आणि निर्णयक्षमतेवर एक व्यापक हल्ला आहे, ज्याचा उद्देश भारताला चीनचा प्रतिस्पर्धी म्हणुन पुढे येऊ द्यायचे नाही हाच आहे.चीन प्रचंड वेगाने या विषयावरती काम करत आहे, त्यामुळे भारताने सुद्धा मानसिक युद्धनिती क्षेत्रात संशोधन करून, आपली लढण्याची क्षमता वाढवली पाहिजे. याकरता आपल्याला आपले शास्त्रज्ञ, खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि सगळ्याच्या ज्ञानाचा वापर करून या क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल. लेखाच्या पुढच्या भागांमध्ये हे युद्ध जिंकण्यासाठी भारताने नेमके काय करायला पाहिजे, यावरती आपण चर्चा करू.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन