नवी दिल्ली, दि. १३ : विशेष प्रतिनिधी : मोदी सरकारने गुलामगिरीचे आणखी एक चिन्ह पुसून ‘पोर्ट ब्लेअर’ (Port Blair) चे नाव बदलून ‘श्री विजयपूरम्’ असे केले आहे.
मोदी सरकार ब्रिटिशांच्या गुलामगिरीची प्रतीके एक एक करून हटवत आहे. अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेऊन अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या 'पोर्ट ब्लेअर'चे नाव बदलले आहे. आता पोर्ट ब्लेअरला 'श्रीविजयपूरम्' म्हणून ओळखले जाणार आहे.
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून देशाला मुक्त करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने 'पोर्ट ब्लेअर'ला ‘श्री विजयपूरम्’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपूरम्’ हे नाव भारताचा स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान - निकोबारचे योगदान दर्शवते.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. येथेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता," असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी नमूद केले आहे.
'ईस्ट इंडिया कंपनी'ने १७८९ साली आर्चीबाल्ड ब्लेअरच्या सन्मानार्थ या चाथम बेटास 'पोर्ट ब्लेअर' असे नाव दिले होते.