डबेवाले, चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार

14 Sep 2024 14:51:22

mumbai dabbawala
 
मुंबई, दि. १३: प्रतिनिधी : मुंबईतील डबेवाले (Mumbai dabbawala) आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या ३ वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात यासंदर्भातील आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे. 'प्रधानमंत्री आवास योजने'त ही घरे बांधली जाणार असून 'म्हाडा'ने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी ३० एकर जागा 'प्रियांका होम्स रिअॅलिटी' देणार असून, नमन बिल्डर ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत. यातून १२ हजार घरांची निर्मिती होणार असून, ती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकी ५०० चौरस फूट आकाराचे घर केवळ २५ लाखात दिले जाणार आहे. डबेवाले आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न हे येत्या ३ वर्षात पूर्ण होणार आहे.
 
"आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत आणि म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहेत. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल," असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 'सह्याद्री अतिथीगृह,' मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला 'नमन बिल्डर'चे जयेश शाह, 'प्रियांका होम्स रिअॅलिटी'चे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, 'चर्मकार निवारा असो.'चे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0