मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी गणेशोत्सवात मंडळांचे देखावे, गणरायाच्या मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील गणेशभक्तांची गर्दी होत असते. त्यात दि. १२ सप्टेंबरपासून मुंबई परिसरात गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतलेला पाहायला मिळत आहे. मुंबईत वेगवेगळ्या मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी भक्तांची गर्दी वाढत असल्याने परिणामी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्यात ही वाढ होणार आहे. ज्यामुळे बेस्टने ही वाहने उभी करण्यासाठी पे अँण्ड पार्कची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत वाहन चालवण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी वाहन उभे करणे, हे जोखमीचे काम असते. कारण मुंबईतील रस्त्यांवर वाहने उभी केल्यास दंडात्मक कारवाईची नागरिकांना भीती असते. तसेच रस्त्यावर वाहने उभी केल्यास वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे बेस्टने पे अँण्ड पार्कची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वडाळा येथील जीएसबी गणपती, राम मंदिर येथे भेट देणाऱ्या गणेशभक्तांना वडाळा आगारात पे अँण्ड पार्कची सुविधेचा लाभ घेण्यात येईल. ही सुविधा दि. १७ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.