लालबागचा राजा मंडळ परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट!

12 Sep 2024 14:03:18
 
Lalbaugh
 
मुंबई : लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी होत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत लालबागचा राजा मंडळ परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. हे चोरटे गर्दीचा फायदा घेऊन सर्वसामान्य भाविकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करत आहेत.
 
गणेशोत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक भाविक मुंबईतील मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे या गणपती मंडळ परिसरात भाविकांची एकच गर्दी जमते. हीच संधी साधून काही चोरटे भाविकांच्या मौल्यवान वस्तू, पाकिटं आणि वाहनांची चोरी करतात. मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागतात. अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींसह सर्वसामान्य लोकांची दर्शनासाठी गर्दी होते.
 
हे वाचलंत का? - "वोट जिहादसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही!"
 
दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी अंधेरी येथील एका भाविकाची दुचाकी पळवल्याची घटना पुढे आली आहे. याशिवाय महिलांच्या मौल्यवान दागिन्यांवरही या चोरट्यांची नजर आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी भाविक भक्तांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0