खेकड्याचा नैवेद्य आणि १५० वर्षे जुनी गौरी पूजनाची परंपरा

11 Sep 2024 15:05:51


gavan family
 
परळ : भोईवाडयातील ‘गवाण’ कुटुंबात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौराईचे पूजन मोठ्या उत्साहात पार झाले. त्यांच्या पारंपरिक ‘आगरी पद्धतीने’ हे गौरीपूजन झाले. या कुटुंबात गौरी पूजनाची परंपरा १५० वर्षे जुनी आहे. गवाण कुटुंबातील ही परंपरा त्यांच्या अनेक पिढ्यांनी जपून ठेवलेली आहे. मंगळवारी ‘गवाण’ कुटुंबात गौराईचे आगमन झाले. या कुटुंबात लहान गौराई आणि मोठी गौराई अशा दोन गौराई विराजमान होतात. लहान गौराई तेरड्या पासून तयार केलेली होती आणि मोठ्या गौराईचे मुखवटा, हात, पाय असे विविध अवयव बाजारतून विकत आणून तिला आगमनाच्या दिवशी सजवले गेले होते. गौराईला सुंदर साडी नेसवून, शालू चढवून आणि नथ, लक्ष्मीहार, ठुशी, मंगळसूत्र, मोत्यांची माळ, पोवळ्यांची माळ असे दागिने घालून सजवले गेले, तिच्या केसांत गजरा माळला होता. हे दागिने सुद्धा गवाण कुटुंबाचे पिढीजात दागिने आहेत. पहिल्या दिवशी गौरीला भाकरी, भाजी, फराळ असा नैवेद्य दाखवला गेला. दुसऱ्या दिवशी आगरी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेला ‘खेकड्यांचा नैवेद्य’ गौरीला दाखवला गेला. हा ‘खेकड्यांचा नैवेद्य’ फक्त गौराईसाठी होता. गणपतीसाठी वेगळा शाकाहारी नैवेद्यच तयार केला होता. आजूबाजूच्या परिसरातील महिला मोठ्या संख्येने गौराई आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गवाण कुटुंबियांच्या घरी उपस्थित होत्या.

 

Powered By Sangraha 9.0