नागालँडच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण नागामंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन

10 Sep 2024 11:59:26

nagamandi
 
(Image Source : DIPR Nagaland)  
 
मुंबई, दि. १० : प्रतिनिधी : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज नागालँडच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणा-या नागामंडई या १० एकरवर उभ्या राहणा-या कृषी बाजारपेठेचे भूमिपूजन करण्यात आले. चुमौकेडिमा जिल्ह्यातील सेथेकेमा-ए येथे संपन्न झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
नागामंडई हा कृषी विभागाच्या सहकार्याने ग्रामीण ॲग्रो फार्म्स लिमिटेड या कंपनीचा उपक्रम आहे. या कंपनीतर्फे नागालँडमध्ये १ हजार एकरवर शेती करण्यात येत असून या शेतीतील उत्पन्न शेतमाल नागामंडई मध्ये विक्रीस आणला जाणार आहे. या नागामंडईमुळे नागालँडमधील शेतकरी संपन्न, समृध्द होणार असून नागालँडमधील कृषी आणि व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. पर्यायाने नागालँडचा चांगला विकास होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
नागामंडईच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्पर्धात्मक किमतीत उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक वाजवी आणि पारदर्शक बाजारपेठ, सुधारित बाजारपेठेतील प्रवेश, कार्यक्षम खरेदी, साठवण आणि वितरणाद्वारे कापणीनंतरचे नुकसान कमी करणे आणि नागालँडमधील आर्थिक विकासाला आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश होतो.
 
मंडीमध्ये व्यापाऱ्यांसाठी ११० किरकोळ दुकाने, एकूण ४००० मेट्रिक टन क्षमतेची १० गोदामे, पारदर्शक व्यापारासाठी २ लिलाव यार्ड्स, प्रत्येकी ५०० मेट्रिक टन क्षमतेचे २ कोल्ड स्टोरेज युनिट्स आणि दोन्ही वातानुकूलित किसान भवन असतील, अशी माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
 
यावेळी नागालँडचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष मुगाथोआए, रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, रिपब्लिकन पक्षाचे आमदार लिमाअनयन चाँग, आमदार मथंग यानथन, आमदार ए.आर. ज्वेगा, घनश्याम चिरणकर, सलीम, जी.के. रमा कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत साहु, सांगर संगवई आणि चेतना गांगर यांनी केले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0