व्हिएतनाम मध्ये निसर्गतांडव; पूल कोसळला, वाहने बुडाली, चक्रीवादळाचे थैमान !

10 Sep 2024 18:44:58
 
vietnam
 
 
नवी दिल्ली : व्हिएतनाम मधील फु थो या परीसरात पूल कोसळण्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. ३७५ मीटर लांबीचा फोंग चाऊ पूल कोसळल्याने किमान, १० वाहने बुडाली असून, या घटनेनंतर १३ लोक बेपत्ता असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. बचावकार्य सुरू असून, पुलाचा काही भाग अजूनही सुरक्षित आहे.

सध्या व्हिएतनाम "यागी" या चक्रीवादळाशी झुंज देत आहे. गेल्या काही दशकांमधील हे सर्वात शक्तिशाली वादळ असून याचा जबर फटका संपूर्ण देशाला बसला आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या भूस्खलनामुळे जवळपास, ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात, लोकांना पूराचा सामना करावा लागत आहे. पूल कोसळण्याव्यतिरिक्त, काओ बांग या प्रांतात भूस्खलनामुळे, २० जणांना घेऊन जाणारी बस वाहून गेली. मुसळधार पावसात रस्ते बंद असल्यामुळे बचाव पथकाला बचावकार्य करण्यात अडथळे निर्माण होत आहे.

व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांनी, आपत्कालीन मदतीची घोषणा केली आहे. तसेच, लष्कराला बचावकार्यच्या प्रयत्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत. यागी चक्रीवादळाने उत्तर व्हिएतनामच्या औद्योगिक केंद्रांमध्येही लक्षणीय व्यत्यय आणला असून असंख्य कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि गंभीर नुकसान झाले आहे. अनेक घरांची वीज खंडित झाली असून अनेक भागात दूरसंचार खंडित झाला आहे. ५.७ दशलक्षाहून अधिक नागरिक वीजेविना राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

वीस लाख लोकसंख्या असलेल्या हायफॉन्गमधील औद्योगिक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारखान्यांची छताचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे कामगारांना उपकरणे वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागला. हैफॉन्गमधील दक्षिण कोरियाच्या एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या समूहाच्या कारखान्यांचे लक्षणीय नुकसान झाले, तरी, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. व्हिएतनामच्या हवामान खात्याने पूर आणि भूस्खलनाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच, गेल्या ४८ तासांत उत्तरेकडील भागात २०८ ते ४३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
Powered By Sangraha 9.0