वॉशिंग्टन डीसी : आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, आयफोन १६ प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अॅप्पलचा ६.९ इंच डिस्प्ले असलेला आयफोन १६ प्रो मॅक्स खरेदीसाठी उपलब्ध झालेला असून, आयफोन १६, आयफोन १६ प्रो, आयफोन १६ प्लस,सुद्धा सादर करण्यात आले आहेत. कॅलिफोर्नियातील अॅप्पल पार्क मधल्या वार्षिक उत्सवात याची घोषणा करण्यात आली आहे.
आयफोन १६ मध्ये A18 प्रो चिपचा समावेश केला गेला आहे. नवीन चिप त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा अधिक वेगवान आणि अधिक कार्यक्षम आहे. या स्मार्टफोनची चौकट अतिशय पातळ असून आकर्षक आहे. त्याच बरोबर यात 120Hz प्रोमोशन डिस्प्ले तंत्रज्ञान देखील आहे. कॅमेरा कंट्रोलचं बटन फोनच्या उजव्या बाजूला आहे. त्याला सॉफ्टवेअर सपोर्ट असून त्यामुळे कॅमेरा हाताळणे सुसाह्य होणार आहे. येत्या काही महिन्यात "ऍपल इंटेलिजेंस" लॉन्च होणार असून वापरकर्त्यांना कॅमेरा नियंत्रणाद्वारे "व्हिज्युअल इंटेलिजन्स" हे फीचर सुद्धा उपलब्ध होणार आहे. ॲपलच्या या कार्यक्रमात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर दिलेला आढळून आला आहे. आयफोन्सची नवीन मालिका कंपनीच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टम – Apple Intelligence सह येत आहे.
आयफोन १६ चे नवे मॉडेल १३ सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात आणि २० सप्टेंबरपासून देशात उपलब्ध होतील. भारतात आयफोन १६ ची किंमत ७९,९०० रुपये आणि आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये असणार आहे. त्याच बरोबर, आयफोन १६ प्रो ची किंमत १,१९,९०० रुपये तर आयफोन १६ प्रो मॅक्स ची किंमत १,४४,९०० रुपये असणार आहे.