केरळमध्ये अभ्यासक्रमात, पण आम्हाला राज्यात घरची कौतुकाची थाप हवी!

10 Sep 2024 18:39:58
Dabewala Association

मुंबई :
मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्याची कहाणी आता घराघरात पोहचणार आहे. कारण केरळ सरकारने इयत्ता ९वीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या जीवनावर आधारित एका धड्याचा समावेश केला आहे. ‘द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर’ असा हा धडा ह्युग आणि कॉलीन गँट्झर यांनी लिहला आहे. त्यामुळे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय शिक्षणात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कामाची माहिती सांगणारा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

विदेशातील अनेक विद्यापीठात मुंबईच्या डबेवाल्यांवर केस्टडी केला जातो. तसेच विदेशात मुंबईच्या डब्बेवाल्यांचे मॅनेजमेंट स्कील शिकवले जाते. पंरतु अनेक दिवस भारतात शालेय शिक्षणात डब्बेवाल्यांचा समावेश नव्हता. ही त्रुट केरळ सरकारने दूर केली. मात्र महाराष्ट्र राज्यात अद्याप शालेय विद्यार्थ्यांना डब्बेवाल्याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे आमच्या पाठिवर घराच्यांनी अर्थात महाराष्ट्र सरकारने कौतुकाची थाप देत मुंबईच्या डब्बेवाल्यांवर आधारित एक धडा समाविष्ट करावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशने केली आहे.

१८९० मध्ये पहिले टिफीन महादू हावजी बच्चे यांनी दादरहून फोर्ट मुंबईला नेल्यानंतर ही सेवा सुरु झाली. एका पारशी महिलेने आपल्या पतीला टिफिन पोहचवण्याचे काम बच्चे यांना सांगितले. ज्यानंतर ही मुंबईच्या डब्बेवाल्याची सेवा सुरु झाली. तरी १३० वर्षांहून अधिक काळ ही सेवा सुरु आहे. ज्यामुळे ५ हजारांहून अधिक जण या डब्बेवाला संघटनेशी जोडले गेलेत. ते जवळपास २ लाखांहून अधिक लोकांना डब्बा पोहचवण्याचे काम करतात.

Powered By Sangraha 9.0